मोहन जोशींच्या वक्तव्यामुळे बेळगावमधील नाट्य संमेलन अडचणीत
By Admin | Updated: December 11, 2014 13:39 IST2014-12-11T13:30:22+5:302014-12-11T13:39:59+5:30
नाट्य परिषदेचा मंच हा सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही, मोहन जोशींच्या या वक्तव्यामुळे बेळगावमध्ये होणारे नाट्य संमेलन अडचणीत सापडले आहे.

मोहन जोशींच्या वक्तव्यामुळे बेळगावमधील नाट्य संमेलन अडचणीत
ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. ११ - अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशींच्या वक्तव्यामुळे बेळगावमध्ये होणारे नाट्य संमेलन अडचणीत सापडले असून आता हे संमेलन बेळगावात घेणे शक्य नाही असे बेळगाव नाट्य परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. नाट्य परिषदेचा मंच हा सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही, असे वक्तव्य मोहन जोशी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक दुखावले गेले असल्याने बेळगावमध्ये नाट्य संमेलन घेण्यास नकार देण्यात आला आहे. जोशी यांच्या वक्तव्याशी नाट्य परिषद असहमत असून जोशींनी सीमावासियांची माफी मागावी असा ठराव बेळगाव नाट्य परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पुढील वर्षी बेळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसांचे संमेलन घेण्यात येणार होते, मात्र आता ते अडचणीत सापडले आहे
काल बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोशी यांनी सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी वेगळा मंच आहे. त्या विषयाची नाट्य परिषदेत चर्चा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. राजकीय मंचावर कधी नाटकाविषयी, तेथील समस्यांविषयी चर्चा होताना पाहिली आहे का? मग नाट्य परिषदेत राजकीय विषयावर का बोलावे असा सवालही त्यांनी केला होता.
मात्र जोशी यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्षेप नोंदवला होता. ज्या मराठी माणसाच्या रंजनासाठी ही नाट्य चळवळ सुरू आहे, त्याच कलाकारांनी अशी भूमिका घेणे योग्य नसून जोशी यांचे विधान आक्षेपार्ह असल्याचे मत एकीकरण समितीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.