महाकुंभमेळ्यासाठी 100 मीटर पाण्याखालीही ड्रोन; अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमुळे जग होणार थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 10:04 IST2024-12-30T10:03:05+5:302024-12-30T10:04:21+5:30
१३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रथमच संगम क्षेत्रात पाण्याखाली ड्रोन तैनात केले जाणार आहेत.

महाकुंभमेळ्यासाठी 100 मीटर पाण्याखालीही ड्रोन; अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेमुळे जग होणार थक्क
महाकुंभनगरी : उत्तर प्रदेश सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभमेळ्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. याअंतर्गत १०० मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून १२० मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या भव्य सोहळ्यात ४५ कोटींहून अधिक तीर्थयात्री सहभागी होण्याची शक्यता आहे.
१३ जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रथमच संगम क्षेत्रात पाण्याखाली ड्रोन तैनात केले जाणार आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही झाला वापर
यावर्षी अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रथमच वापरल्या गेलेल्या ड्रोन विरोधी प्रणालीचा उपयोग महाकुंभमेळ्यातही केला जाणार आहे.
संगम स्नानादरम्यान प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा करण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याखाली कार्यरत असलेले हे ड्रोन २४ तास देखरेख करतील आणि कमी प्रकाशातही कार्यक्षम असतील. याशिवाय ‘टेथर्ड ड्रोन’ हवाई क्षेत्राचे संरक्षण करतील.
१०० मीटर खोलीवर कार्यरत असलेले हे अत्याधुनिक ड्रोन कोणत्याही परिस्थितीत अचूक माहिती देण्यास सक्षम आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ड्रोन पाण्यात फिरत राहणार अन्...
प्रयागराजचे पोलिस महानिरीक्षक (पूर्व क्षेत्र) राजीव नारायण मिश्रा यांनी उच्च गतीने कार्य करणाऱ्या पाण्याखालील ड्रोनसाठी नुकतीच चाचणी घेतली. हे अत्याधुनिक ड्रोन १०० मीटरपर्यंत पाण्यात फिरू शकतात आणि तत्काळ रिपोर्ट पाठवू शकतात. या ड्रोनला कोठूनही नियंत्रित करता येते आणि पाण्याखाली संशयास्पद हालचालींचे अचूक निरीक्षण यामुळे होऊन तातडीने कारवाई करता येईल, असे ते म्हणाले.
७००हून अधिक बोटी
पाण्यावर नजर ठेवण्यासाठी पीएसी (प्रांतीय सशस्त्र पोलिस), एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल), एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) यांच्या कर्मचाऱ्यांसह ७००हून अधिक बोटी तैनात राहणार आहेत. सुरक्षेसाठी रिमोट-नियंत्रित ‘लाइफबॉय’ (सुरक्षा यंत्र) उपकरणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
‘एआय’द्वारे गर्दीचा अंदाज
- ड्रोनशिवाय, एआय-सक्षम कॅमेरे गर्दीचे विश्लेषण करतील, गर्दीचा अंदाज लावतील आणि उपस्थितांची संख्या तातडीने मोजतील.
- चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान सुरक्षा अधिक मजबूत करेल. महाकुंभमेळ्यासाठी उभारलेल्या या अत्याधुनिक व्यवस्थेमुळे जगभरात एक नवा आदर्श प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.