गोमुत्राला घाबरतो ‘ड्रॅक्युला’
By Admin | Updated: October 21, 2016 16:29 IST2016-10-21T16:24:48+5:302016-10-21T16:29:42+5:30
‘ड्रॅक्युला’पासून संरक्षण करण्यासाठी अहमदाबाद बोर्डच्या'आरोग्य गीत' या साहित्यात गोमुत्र वापरण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे.

गोमुत्राला घाबरतो ‘ड्रॅक्युला’
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 21 - ‘ड्रॅक्युला’पासून संरक्षण करण्यासाठी अहमदाबाद बोर्डच्या 'आरोग्य गीत' या साहित्यात गोमुत्र वापरण्याचा अजब सल्ला देण्यात आला आहे. ड्रॅक्युला गोमुत्राला घाबरतो, असा जावईशोध यामध्ये लावण्यात आला आहे. गोमुत्राचे महत्त्व पटवून देताना, गोमुत्र शिंपडल्याने ड्रॅक्युलापासून संरक्षण होते, ड्रॅक्युला दूर राहतो, असा हास्यास्पद दावा यात करण्यात आला आहे.
गाईचे दुध, शेण आणि मुत्राबाबत अनेक फायदे सांगताना, 'गोमुत्रामुळे ड्रॅक्युलाला स्वतःपासून दूर ठेवता येते', असे गुजरात गोसेवा आणि गोचर विकास बोर्डने म्हटले आहे. मानवी शरीरात भूत शिरल्यानंतर अनेक रोग होतात, शास्त्रांमध्ये या रोगाला 'भूतमिष्ठांग' असे म्हटले जाते, असा समज समाजात प्रचलित आहे.
या साहित्यात, गोमुत्रामध्ये कशा पद्धतीने अद्भुत शक्तींशी लढण्याची ताकद आहे, हे समजावून सांगण्यात आले आहे. 'भगवान शंकर सर्व भूतांचे देव आहेत, शंकराच्या मस्तकावर गंगा विराजमान आहे, तर नंदी हे त्यांचे वाहन आहे. गोमुत्रामध्येही गंगेचा समावेश आहे. तर, नंदी गोमातेचा पुत्र असल्यामुळे भूत-सैतान गोमुत्राला घाबरतात', असा दावा या साहित्यात करण्यात आला आहे.
विज्ञान भूताचे अस्तित्व मानत नसले तरी, मात्र पश्चिमेकडील देशांमध्ये ड्रॅक्युला, सैतान भूता-खेतांचे, चेटकीणींचे अस्तित्व मानले जाते. भूत-सैतानांवर तर सिनेमेही बनवण्यात आले आहेत, असे आरोग्य गीताच्या एका धड्यात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, 1897 साली लेखक ब्रॅम स्टोकर यांनी 'ड्रॅक्युला' ही कांदबरी लिहिली तेव्हा त्यांनी गोमुत्राला 'ड्रॅक्युला' घाबरतो, अशी कल्पनाही केली नसावी.