डॉ. विजय दर्डा यांना मोहन बाबू विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:48 IST2025-08-03T11:47:12+5:302025-08-03T11:48:55+5:30
सामाजिक उत्तरदायित्व, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपण्यासाठी तसेच प्रसारमाध्यम उद्योगाच्या प्रगतीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची या विद्यापीठाने प्रशंसा केली. या समारंभाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे माजी मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. विजय दर्डा यांना मोहन बाबू विद्यापीठाकडून डी. लिट. पदवी प्रदान
डॉ. दर्डा यांचे प्रतिपादन
तिरूपती : लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांना मोहन बाबू विद्यापीठाने (एमबीयू) सन्माननीय डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट) ही पदवी शनिवारी प्रदान केली. पत्रकारिता, प्रसारमाध्यम स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाहीविषयक सुधारणा या क्षेत्रांमध्ये डॉ. दर्डा यांच्या अनमोल योगदानाचा विद्यापीठाने अशा समारंभाद्वारे गौरव केला. सामाजिक उत्तरदायित्व, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपण्यासाठी तसेच प्रसारमाध्यम उद्योगाच्या प्रगतीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची या विद्यापीठाने प्रशंसा केली.
या समारंभाला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे माजी मंत्री व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मोहन बाबू विद्यापीठाचे कुलपती आणि श्री विद्यानिकेतन एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मोहन बाबू, जागतिक कीर्तीचे तालवादक पद्मश्री शिवमणी, विद्यापीठाचे प्र-कुलपती विष्णू मांचू, विश्व हिंदी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मभूषण प्रा. यार्लगड्डा लक्ष्मीप्रसाद, एसव्हीईटीचे कार्यकारी संचालक विनय महेश्वरी, श्री विद्यानिकेतन एज्युकेशनल ट्रस्टच्या सदस्य विरानिका मांचू व विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि विद्यार्थी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ. दर्डा यांनी मोहन बाबू विद्यापीठाने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हा गौरव लोकमत मीडिया ग्रुपने जोपासलेली निर्भीड पत्रकारितेची परंपरा आणि संस्थापक जवाहरलाल दर्डा यांना अर्पण केला.
डॉ. दर्डा म्हणाले की, जग प्रचंड वेगाने बदलत आहे आणि यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे मुख्य
कारण आहे. याचा समाजावर होणारा परिणाम प्रचंड असून, तो यापुढे अधिक वेगाने वाढणार आहे. एआयला कोणीही घाबरू नये, तर त्याचा स्वीकार करावा व आपापल्या क्षेत्रात त्याचा उपयोग करण्यास शिकावे. एआय माणसांची जागा घेईल का, हे निश्चित सांगता येत नाही; पण जी माणसे एआय समजून घेतील, ती एआय न उमगलेल्या माणसांची जागा घेतील.
डॉ. विजय दर्डा यांचा यापूर्वी दोनदा डी. लिट.ने सन्मान
डॉ. विजय दर्डा यांना यापूर्वीही डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) आणि रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटी (अमेरिका) यांच्याकडून पत्रकारिता आणि माध्यम उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी सन्माननीय डी. लिट. पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत.