dr. V. Anantha Nageswaran:अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:32 IST2022-01-28T20:27:19+5:302022-01-28T20:32:02+5:30
dr. V. Anantha Nageswaran: केंद्र सरकारने डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

dr. V. Anantha Nageswaran:अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बदलले
नवी दिल्ली: येत्या 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण तत्पुर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केली आहे. डॉ.व्ही.अनंत नागेश्वरन (dr. V. Anantha Nageswaran) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी तात्काळ प्रभावाने देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.
सरकार पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे, पण त्या आधी नागेश्वरन यांची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31जानेवारीपासून सुरू होत आहे. आर्थिक आढावा त्याच दिवशी संसदेत मांडला जाणार आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करतील.
Dr V Anantha Nageswaran appointed as the Chief Economic Advisor (CEA) for Union Finance Ministry. pic.twitter.com/kKFHor7obJ
— ANI (@ANI) January 28, 2022
पीएम मोदींचे सल्लागार
अनंत नागेश्वरन हे 2019 ते 2021 पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य होते. याशिवाय त्यांनी लेखक, शिक्षक, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आहेत. सिंगापूरच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिक्षकही राहिले आहेत.
आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले
अनंत नागेश्वरन IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. याशिवाय ते क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले आहेत. अनंत नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे. याशिवाय त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवीही घेतली आहे.