डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 05:53 IST2025-12-18T05:52:42+5:302025-12-18T05:53:43+5:30
पॅरिसमधील भारताचे राजदूत शर्मा यांची सदिच्छा भेट

डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून डॉ. बाबासाहेबांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने बाबासाहेबांचा पुतळा युनेस्कोला भेट स्वरूपात दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
युनेस्कोला डॉ. आंबेडकर यांचा पुतळा भेट दिल्याबद्दल युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत आभार मानले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच घटना आहे. केंद्र सरकारच्या वतीने शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने युनेस्कोमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमास संबोधित केले. या प्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गारगे उपस्थित होते.
शिवनेरी किल्ल्यावर भव्य नामांकन सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले (तामिळनाडूतील एक) असे देशातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे ही राज्यासाठी गौरवास्पद बाब असून, नामांकन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी शिवनेरी किल्ल्यावर भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे, असे फडणवीस म्हणाले.