वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:11 IST2025-04-04T11:10:41+5:302025-04-04T11:11:25+5:30

लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली.

Doubts over stance on Waqf Amendment Bill; Sharad Pawar along with NCP 2 MP absent from voting | वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

वक्फ सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून शंका; २ खासदारांसह शरद पवारही मतदानाला गैरहजर

नवी दिल्ली - वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकावरून देशभरात सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यातच हे विधेयक संसदेच्या सभागृहात मंजूर करताना झालेल्या मतदानावेळी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या २ खासदारांच्या अनुपस्थितीने सगळ्यांचे लक्ष वेधले. लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचे २ आणि राज्यसभेत स्वत: शरद पवार मतदानावेळी गैरहजर होते. इतकं महत्त्वाचं विधेयक पारित होताना शरद पवारांनी गैरहजेरीनं त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

बुधवारी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर दीर्घ चर्चा करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री मतदानानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेत या विधेयकावर होणाऱ्या मतदानावेळी खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे हे गैरहजर होते. विशेष म्हणजे सुरेश म्हात्रे हे वक्फ सुधारणा विधेयकासाठी गठीत केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्यही होते परंतु काही बैठकीत त्यांनी सहभाग घेतला नव्हता. 

तर शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईत उपचार घेत आहेत त्यामुळे ते दिल्लीत गेले नाही असं शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. परंतु पवार गटाच्या २ खासदाराच्या गैरहजेरीने राजकीय चर्चांना उधाण आले. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाने वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने लोकसभेत मतदान केले. मुस्लीम समाजातील भगिनी, इतरांना यात न्याय मागता येईल अशी तरतूद वक्फ सुधारणा विधेयकात आहे. गरीब मुस्लीम समाजातील उन्नतीसाठी त्याचा वापर होईल. मुस्लीम समाजाच्या प्रगतीसाठी जी काही पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या विधेयकात आहे. त्याचा फायदा समाजाला होऊ शकतो. त्यामुळे विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

राज्यसभेतही वादळी चर्चा

लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. या सभागृहात १३ तासाहून जास्त चर्चा झाली. त्यानंतर मतदान घेण्यात आले. त्यात विधेयकाच्या बाजूने १२८ मते पडली तर विरोधात ९५ मते पडली. लोकसभेतही २८८ खासदारांचा विधेयकाला पाठिंबा मिळाला तर २३२ खासदारांनी त्याला विरोध केला होता.  

Web Title: Doubts over stance on Waqf Amendment Bill; Sharad Pawar along with NCP 2 MP absent from voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.