रेल्वेच्या तत्काळ तिकीट यंत्रणेवर संशयाचे सावट; मिनिटात लागते ७३% प्रवाशांना ‘वेटिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:39 IST2025-06-06T13:38:58+5:302025-06-06T13:39:16+5:30
तिकिटे अगोदरच बुक केली जातात का, अशी शंका निर्माण झाली आहे

रेल्वेच्या तत्काळ तिकीट यंत्रणेवर संशयाचे सावट; मिनिटात लागते ७३% प्रवाशांना ‘वेटिंग’
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय रेल्वेची ‘तत्काळ तिकीट’ सेवा, अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी मानली जात होती, मात्र आता ती अडचणीचे कारण बनली आहे. ३९६ जिल्ह्यांतील ५५,००० हून अधिक प्रवाशांना सोबत घेत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘लोकलसर्कल’च्या सर्वेक्षणानुसार, ७३% प्रवाशांनी सांगितले की, त्यांना तत्काळ तिकीट बुकिंग विंडो उघडल्यानंतर एका मिनिटातच वेटिंग यादीत टाकण्यात आले. यामुळे तिकिटे अगोदरच बुक केली जातात का, अशी शंका निर्माण झाली आहे.
आयआरसीटीसीवरील विश्वास झाला कमी
आता फक्त ४०% प्रवासी तिकिटे बुक करताना आयआरसीटीसीवर विश्वास ठेवतात. बाकीचे एकतर ट्रॅव्हल एजंटची मदत घेतात किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन लांब रांगेत उभे राहतात. अधिकृत एजंट आणि काही तांत्रिक तज्ज्ञ सॉफ्टवेअर बॉट्स वापरतात किंवा विशेष टूल वापरून बुकिंग सुरू होताच हाय स्पीडने तत्काळ तिकिटे बुक करतात, असा संशय वाढला आहे.
२०१६ मध्ये घोटाळा
रेल्वेने २०१६ मध्ये तत्काळ तिकीट घोटाळा उघडकीस आणला होता. यात काही ट्रॅव्हल एजंट बनावट नावांनी तिकिटे बुक करत होते आणि नंतर ‘नाव बदलण्याच्या पर्याया’द्वारे ती खऱ्या प्रवाशांना तिकिटे पैसे देत होते. यासाठी ते रेल्वे कर्मचाऱ्यांशी संगनमत करत होते.
यानंतर, रेल्वेने अनेक सुधारणात्मक उपाययोजना केल्या. मात्र, या उपाययोजना असूनही, सिस्टममधील त्रुटी अजूनही कायम आहेत आणि एजंट्सची पकड अजूनही कमी झालेली नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले.
मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये तत्काळ बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. मी सकाळी १० वाजता क्लिक केले तेव्हा पेज लोड होण्यास सुरुवात झाली आणि काही सेकंदात सर्व सीट भरल्या गेल्या.
-राजेंद्र खंडेलवाल, प्रवासी
रेल्वेची ऑनलाइन तिकीट प्रणाली पूर्णपणे पारदर्शक आहे. तत्काळ तिकीट प्रणालीमध्ये, प्रत्येक १० जागांसाठी ऑनलाइन रांगेत एक हजाराहून अधिक लोक असतात.
-दिलीप कुमार, कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड (माहिती आणि प्रसिद्धी)