‘त्या’ मशिदीची दारे अखेर महिलांसाठी खुली
By Admin | Updated: April 26, 2016 07:26 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T07:26:41+5:30
वास्तुशिल्पकला आणि काष्ठशिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या एक हजार वर्षे जुन्या मशिदीची दारे प्रथमच महिलांसाठी खुली करण्यात आली आहेत.

‘त्या’ मशिदीची दारे अखेर महिलांसाठी खुली
कोट्टायम : केरळच्या थझाथानगडी येथे आपल्या समृद्ध वास्तुशिल्पकला आणि काष्ठशिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या एक हजार वर्षे जुन्या मशिदीची दारे प्रथमच महिलांसाठी खुली करण्यात आली आहेत. महिलांना मशिदीच्या वास्तुशिल्पकलेचे दर्शन घडविण्यासाठी रविवारी मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.
मशिदीत प्रवेश मिळणार असल्याची वार्ता आधीच कानी पडल्याने केरळच्या विविध भागांमधून तसेच विदेशातून हजारोंच्या संख्येने मुस्लिम महिला येथे आल्या होत्या. देशात धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे, ही मागणी जोर धरत असतानाच या मशिदीची दारे महिलांसाठी खुली करण्यात आली हे विशेष.
‘या मशिदीत येऊन प्रार्थना करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. परंतु आपली इच्छा जाहीर करण्यास मी घाबरत होते. आता ही संधी मिळाली याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया फातिमा या महिलेने व्यक्त केली. मीनाचील नदीच्या काठावर बांधण्यात आलेली ही मशीद भारतातील सर्वांत जुनी मशीद आहे आणि ती ताज जुमा मशीद म्हणूनही ओळखली जाते. (वृत्तसंस्था)
>महिलांच्या प्रवेशापूर्वी पुरुषांना काढले बाहेर
‘ही एक हजार वर्षे जुनी मशीद आहे. आमच्या महिलांनी या एक हजार वर्षांत कधीही या मशिदीत पाय ठेवला नव्हता आणि त्यांची या पवित्र स्थळी येण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे मशीद समितीने महिलांना २४ एप्रिल आणि ८ मे रोजी मशिदीत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला,’ असे मशीद समितीचे अध्यक्ष नवाब मुल्लादोम यांनी सांगितले.