घरी बसून हताश होऊ नका, चांगल्या सवयी लावून घ्या!, ‘लॉकडाऊनग्रस्त’ नागरिकांना सरकारचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:27 IST2020-03-26T02:12:00+5:302020-03-26T06:27:04+5:30
सक्तीच्या गृहबंदिवासाचा पहिला दिवस मावळण्याच्या आधीच केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) या प्रसिद्धी विभागाने मनात आणले तर या मोकळ्या वेळेत बरेच काही केले जाऊ शकते, असे ट्विटरवरून सुचविले.

घरी बसून हताश होऊ नका, चांगल्या सवयी लावून घ्या!, ‘लॉकडाऊनग्रस्त’ नागरिकांना सरकारचा सल्ला
नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’मुळे २१ दिवस घरातच बसावे लागणार असल्यामुळे हताश न होता उलट ही चांगली संधी आहे, असे मानून स्वत:चे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या तीन आठवड्यांत चांगल्या सवयी लावून घ्या, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी नागरिकांना केले.
सक्तीच्या गृहबंदिवासाचा पहिला दिवस मावळण्याच्या आधीच केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) या प्रसिद्धी विभागाने मनात आणले तर या मोकळ्या वेळेत बरेच काही केले जाऊ शकते, असे ट्विटरवरून सुचविले.
याआधी पंतप्रधानांनी गेल्या रविवारी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. तेव्हा ‘पीआयबी’ने ‘माय १४ फॉर इंडिया’ हा विशेष हॅशटॅग सुरू केला होता व त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांसह आघाडीच्या पत्रकारांनी या ऐच्छिक सुट्टीत आपण काय करणार, याची मनोगते त्यावर शेअर केली होती. देशव्यापी ‘लॉकडाऊन’ आता सुरू झाला असला तरी अनेक राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर तो गेले काही आठवडे सुरू आहे. तेव्हापासून ‘लॉकडाऊन’मध्ये मी काय करतोय किंवा तुम्ही काय करू शकता, हे एकमेकांना सांगणे व त्याचे फोटो, विनोद अथवा अन्य मजकूर शेअर करणे हा समाजमाध्यमांवर गरमागरम विषय बनला आहे. ‘जशी प्रजा, तसा राजा’ या विरुद्ध उक्तीला जागून सरकारही आता त्यात सामील झाले आहे.
पीआयबीचे ट्विट
एका ट्विटमध्ये ‘पीआयबी’ म्हणते की, आजपासूनचे पुढचे २१ दिवस तुम्ही सकाळी लवकर उठणे, नवे डाएट अनुसरणे व ध्यानधारणा करणे, यांसारख्या नव्या, साध्या, सोप्या सवयी लावण्यासाठी सत्कारणी लावू शकता. अमेरिकी लेखक मॅक्स्वेल माल्ट््झ यांचा दाखला देत ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, २१ दिवसांत एखादी वाईट सवय सुटू शकते किंवा नवी चांगली सवय लावून घेता येते. तुम्हीही या ‘लॉकडाऊन’चा तशा प्रकारे आपल्याच भल्यासाठी उपयोग करून घ्या.