डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:12 IST2025-07-26T06:12:17+5:302025-07-26T06:12:44+5:30

रुग्णांना प्रायोगिक उंदीर किंवा एटीएम समजून पैसे उकळण्यासाठी वापरले जाते, अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांवर टीका केली.

Doctor treated patient like a rat and ATM, court refuses to quash case against doctor | डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार

डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार

डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क


अलाहाबाद : रुग्णांना प्रायोगिक उंदीर किंवा एटीएम समजून पैसे उकळण्यासाठी वापरले जाते, अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांवर टीका केली आणि वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणात डॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.

२९ जुलै २००७ रोजी एका गरोदर महिलेला उत्तर प्रदेशातील खासगी नर्सिंग होम चालवणारे डॉ. अशोककुमार राय यांच्याकडे दाखल करण्यात आले. सकाळी ११ वाजता कुटुंबीयांनी सिझेरियन शस्त्रक्रियेस संमती दिली होती. मात्र, शस्त्रक्रिया सायंकाळी ५:३० वाजता झाली आणि तोपर्यंत गर्भातील भ्रूणाचा मृत्यू झाला होता.

त्याचदिवशी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असेही नमूद आहे की, डॉक्टरच्या कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांनी विरोध दर्शविल्यावर त्यांच्यावर हल्ला केला. शिवाय, डॉक्टरने आधीच ८,७०० रुपये घेतले होते आणि १०,००० रुपये अधिक मागितले, तसेच डिस्चार्ज स्लिप देण्यास नकार दिला.

डॉ. राय यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३१५ (जन्म रोखणे), ३२३ (इजा), व ५०६ (धमकी) अंतर्गत सुरू असलेल्या खटल्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. 

नेमके काय घडले होते?
आपल्याकडे वैद्यकीय पात्रता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, फिर्यादी पक्षाने याला विरोध केला आणि महिलेची प्रकृती दाखल होताना स्थिर होती, परंतु भूलतज्ञ वेळेवर उपलब्ध नसल्याने डॉक्टरने शस्त्रक्रिया उशिरा केली, असे सांगितले. मेडिकल बोर्डाचा अहवाल अविश्वसनीय आहे, कारण त्यात मृत भ्रूणाच्या उत्तरीय तपासणी अहवालाचा विचारच करण्यात आलेला नाही, ज्यात प्रसव वेदनांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. ऑपरेशन थिएटरचा टीपही विरोधाभासी होता, असे मुद्दे मांडले. न्यायालयाने फिर्यादीच्या या मुद्द्यांशी सहमती दर्शवली

उच्च न्यायालयाचे निरीक्षण
ज्याप्रमाणे एक प्रामाणिक डॉक्टर आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतो, त्याचे रक्षण होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे केवळ पैशासाठी अपुऱ्या सुविधा असलेली नर्सिंग होम चालवणाऱ्यांचे रक्षण होऊ शकत नाही. डॉक्टरला कायदेशीर संरक्षण तेव्हाच मिळते जेव्हा व्यावसायिक निकषानुसार काळजी घेतली जाते. खासगी रुग्णालये रुग्णांना ‘गिनी पिग’ किंवा ‘एटीएम’ म्हणून पाहतात.
- न्या. कुमार

Web Title: Doctor treated patient like a rat and ATM, court refuses to quash case against doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.