पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:09 IST2025-09-09T17:03:23+5:302025-09-09T17:09:17+5:30
'भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे लोक आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. मंत्र्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली आहे. दरम्यान, आता निदर्शनांबाबत भारत सरकार सावध आहे. नेपाळमध्ये वाढत्या अशांततेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. भ्रष्टाचार आणि वादग्रस्त सोशल मीडिया बंदीविरोधात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निदर्शनांच्या दरम्यान, भारतीय नागरिकांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत नेपाळचा प्रवास पुढे ढकलावा, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जे आधीच हिमालयीन देशात आहेत त्यांना घरातच राहण्याचा आणि रस्त्यावर न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
'अधिकाऱ्यांनी काठमांडू आणि नेपाळच्या इतर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू केला आहे. नेपाळमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि नेपाळी अधिकाऱ्यांच्या सूचना आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मदतीची गरज असलेले भारतीय नागरिक खालील हेल्पलाइन क्रमांकांवरून दूतावासाशी संपर्क साधू शकतात, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
९७७–९८० ८६० २८८१ (व्हॉट्सअॅपवर देखील)
९७७–९८१ ०३२ ६१३४ (व्हॉट्सअॅपवर देखील)
कालपासून नेपाळमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अनेक तरुणांच्या जीवितहानीबद्दल आम्हाला खूप दुःख आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमींना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, आम्हाला आशा आहे की सर्व संबंधित पक्ष संयम बाळगतील आणि शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे समस्या सोडवतील, असे या निवेदनात म्हटले आहे.