न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका - सरन्यायाधीश लोढा
By Admin | Updated: August 11, 2014 13:17 IST2014-08-11T13:01:31+5:302014-08-11T13:17:09+5:30
न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेली कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरली नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे मत सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी मांडले आहे.

न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ देऊ नका - सरन्यायाधीश लोढा
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - भारताच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याची मोहीम हा चिंतेचा विषय आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेली कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरली नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे मत सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी मांडले आहे.
न्यायाधीश मंजुनाथ यांची हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक करण्यास केंद्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला होता. यानंतर मंजुनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या कॉलेजियमने केलेली शिफारस सार्वजनिक करावी अशी मागणी केली होती. सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी सोमवारी ही याचिका फेटाळून लावली. कॉलेजियम प्रणालीची पाठराखण करत सरन्यायाधीश लोढा म्हणाले, कॉलेजियम प्रणाली अपयशी ठरलेली नाही. मी या प्रणालीनुसार नियुक्त झालो होतो. तर न्या. रोहिंतन या प्रणालीने नियुक्त झालेले शेवटचे न्यायाधीश आहेत. ही प्रणाली अपयशी ठरली असती तर आपणही अपयशी ठरतो. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असे लोढा यांनी सुनावले.
कॉलेजियमचा प्रमुख मी आहे. कॉलेजियमने न्या. मंजूनाथ यांच्याविषयी कोणतीही शिफारस केलेली नाही. मग तुम्हाला ही माहिती कोणी दिली ? असा सवाल करत प्रसारमाध्यमांमध्ये न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे लोढा यांनी नमूद केले,