मध्य प्रदेश, राजस्थानात मतदार याद्यांत गडबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:08 IST2018-08-24T06:07:50+5:302018-08-24T06:08:11+5:30
सुप्रीम कोर्टात याचिका; नावांच्या पुनरावृत्तीबाबत निवडणूक आयोगाकडून मागविले उत्तर

मध्य प्रदेश, राजस्थानात मतदार याद्यांत गडबड
नवी दिल्ली : यावर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान या दोन दोन राज्यांमील मतदारयाद्यांत काही मतदारांची नावे दोन-दोनदा दिसत असल्याची तक्रार काँग्रेस नेते कमलनाथ व सचिन पायलट यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली असून, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून न्यायालयाने उत्तर मागविले आहे.
न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग व मध्य प्रदेश, राजस्थानातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी नोटिसा जारी केल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ आॅगस्ट रोजी होणार आहे.
या याचिकेच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी काँग्रेस नेत्यांच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. ए. एम. सिंघवी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी स्वखर्चाने एक काही ठिकाणी सर्वेक्षण केले. त्यात मतदारयाद्यांत ६० लाख मतदारांच्या नावांची पुनरावृत्ती झाल्याची गंभीर बाब लक्षात आली आहे. राजस्थानातील मतदारयाद्यांची अशीच स्थिती आहे.
व्हीव्हीपॅटची तपासणी करा
मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीहीपॅट) यंत्रांची निवडणूक आयोगाने नीट तपासणी करावी, अशीही विनंती कमलनाथ यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.