संसदीय चर्चेतून व्यंग, विनोद गायब- मोदी
By Admin | Updated: August 13, 2014 04:04 IST2014-08-13T04:04:57+5:302014-08-13T04:04:57+5:30
संसद आणि विधिमंडळातील चर्चेत व्यंग आणि विनोद गायब झाला असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखविली

संसदीय चर्चेतून व्यंग, विनोद गायब- मोदी
नवी दिल्ली : संसद आणि विधिमंडळातील चर्चेत व्यंग आणि विनोद गायब झाला असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखविली. खासदारांनी संसदेतील कामकाजातून जनआकांक्षेच्या कसोटीला उतरण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले. संसदेच्या ग्रंथालयातील सभागृहात मंगळवारी उत्कृष्ठ संसदपटू सन्मान समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी केंद्रीय मंत्री कर्णसिंग आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांना उत्कृष्ट संसदपटू सन्मान प्रदान केला. संसदेतील प्रत्येक बाब भावी पिढीसाठी प्रेरणास्रोत बनायला हवी. अशा प्रकारचे पुरस्कार विधिमंडळात उत्कृष्ट भूमिका बजावणाऱ्या आमदारांनाही द्यायला हवे. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विधानसभाध्यक्षांचे संमेलन बोलावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मोदी म्हणाले. संसदेच्या विशेष अधिवेशनाची उपलब्धी आणि खासदारांच्या भूमिकेबाबत लोक काय विचार करतात याचे सर्वेक्षण व्हायला हवे, असेही ते म्हणाले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पुरस्कारप्राप्त करणारे तिन्ही नेते सध्या राज्यसभेचे सदस्य असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शरद यादव (वर्ष-२०१०, लोकसभा), अरुण जेटली(वर्ष-२०११) डॉ. कर्णसिंग (वर्ष-२०१२) असा हा पुरस्कार आहे. या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्ण अडवाणी, विदेशमंत्री सुषमा स्वराज, खा. विजय दर्डा, टी. सुब्बीरामी रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. (वृत्तसंस्था)