दीक्षित यांच्या "रस्त्यावरील गुंड" टिप्पणीवरून राजकारण पेटले! भाजपाने काँग्रेसला घेरले
By Admin | Updated: June 12, 2017 16:47 IST2017-06-12T16:47:19+5:302017-06-12T16:47:19+5:30
संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपाने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी

दीक्षित यांच्या "रस्त्यावरील गुंड" टिप्पणीवरून राजकारण पेटले! भाजपाने काँग्रेसला घेरले
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - संदीप दीक्षित यांनी लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपाने काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज भाजपाने दीक्षित यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी केली. संदीप दीक्षित यांचे वक्तव्य लष्कराचे मनोबल खच्ची करणारे असल्याचे भाजपाने म्हटले आहे.
काल लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्यावर टीका करताना संदीप दीक्षित यांनी त्यांची तुलना रस्त्यावरील गुंडाशी केली होती. त्यानंतर या वक्तव्याबाबत त्यांनी आपली माफीही मागितली होती. मात्र भाजपाने या विधानाचे भांडवल करण्यास सुरुवात केली आहे. आज भाजपाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दीक्षित यांच्यावर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, "लष्कर सीमेवर देशाचे संरक्षण करत असते. त्याच्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले वक्तव्य लष्कराचा अवमान करणारे आहे. काँग्रेसचे नेते लष्कराचे योगदान दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे."
संदीप दीक्षित यांनी बिपिन रावत यांच्या कार्यशैलीवर टीका करताना त्यांच्या आक्रमक वक्तव्ये करण्यावरून हे वक्तव्य केले होते. "आपले लष्कर सशक्त आहे. त्याने सीमेवर पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. पाकिस्तान कागाळ्या करणे, बाष्कळ बडबड करणे असल्याच गोष्टी करू शकते. पण आपले लष्करप्रमुखही जेव्हा रस्त्यावरील गुंडांप्रमाणे विधाने करतात तेव्हा वाईट वाटते," असे दीक्षित म्हणाले होते.