Digvijay Singh initiative for construction of Ram temple; Donation of Rs. 1,11,111 | राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी 

राम मंदिराच्या उभारणीसाठी दिग्विजय सिंहांचा पुढाकार; 1,11,111 रुपयांची दिली देणगी 

ठळक मुद्देदिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला धनादेश (चेक) पाठविला आहे.

भोपाळ : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. देशाच्या विविध भागातून राम मंदिर बांधण्यासाठी लोक देणगी देत ​​आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनीही भगवान राम यांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी योगदान दिल्याचे वृत्त आहे. दिग्विजय सिंह यांनी 1 लाख 11 हजार 111 रुपये देणगी दिली आहे.

दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला धनादेश (चेक) पाठविला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे. यामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी देशातील जनतेकडून देणगी गोळा करण्याचे काम सौहार्दपूर्ण पद्धतीने व्हावे, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे. तसेच, त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या जुन्या देणगीचा अहवाल जनतेसमोर ठेवण्याची मागणी केली आहे.

याआधी राम मंदिर बांधण्यासाठी 100 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची बातमी समोर आली होती. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मीडियाला माहिती देताना सांगितले की, दोन दिवसांत मोठी देणगी जमा झाली आहे, एवढी माहिती आम्हाला मिळाली आहे. या देणगीमध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्याचे माजी आमदार सुरेंद्र बहादुर सिंह यांचे सर्वाधिक योगदान आहे. 

सुरेंद्र बहादुर सिंह यांनी विहिंपचे उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे  सरचिटणीस चंपत राय यांना 1,11,11,111 रुपयांचा धनादेश दिला. दरम्यान, आपल्या माहितीसाठी अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या आंदोलनात  विश्व हिंदू परिषद आघाडीवर राहिली आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम देखील मागे राहीलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे.  बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले आहे. "राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल", असे अन्सारी म्हणाले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Digvijay Singh initiative for construction of Ram temple; Donation of Rs. 1,11,111

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.