उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:07+5:302015-01-29T23:17:07+5:30

हायकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

The difference in treatment is not negligence | उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

उपचारातील फरक हा निष्काळजीपणा नाही

यकोर्टाचा निर्णय : वेगवेगळी असू शकतात डॉक्टरांची मते

नागपूर : रुग्णाच्या आजारासंदर्भात दोन डॉक्टरांची वेगवेगळी मते असू शकतात व त्यांच्या उपचार करण्याच्या पद्धतीतही फरक असू शकतो असे स्पष्ट करून याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.
एक व्यावसायिक म्हणून डॉक्टरांना रुग्णाची तपासणी केल्यानंतर स्वत:चे मत ठरविण्याचा अधिकार आहे. परंतु, हे मत वस्तुनिष्ठ बाबींवर आधारित नसेल किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले असेल व यामुळे काही नुकसान झाल्यास डॉक्टरवर निष्काळजीपणासाठी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. कोणते प्रकरण फौजदारी निष्काळजीपणाचे आहे व कोणते नाही हे त्या-त्या प्रकरणातील तथ्ये व परिस्थितीवर अवलंबून असते, असे मत न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे.
गौतम सदाशिव (ता. अचलपूर) यांची पत्नी शीला यांचा चार डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतर मृत्यू झाला होता. शीला यांना रक्ताचा कर्करोग होता. याप्रकरणी गौतम यांनी सुरुवातीला परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नाही. यामुळे त्यांनी दोषी डॉक्टरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत कारवाई करण्यासाठी अचलपूर येथील प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. १९ जून २०१० रोजी ही तक्रार फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला. १९ जानेवारी २०१३ रोजी सत्र न्यायालयाने प्रथम श्रेणी न्यायादंडाधिकारी न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या दोन्ही निर्णयांना गौतम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने वैद्यकीय तज्ज्ञ मंडळाच्या अहवालासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून याचिका खारीज केली.

Web Title: The difference in treatment is not negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.