पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला होता. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने या दहशतवादी हल्ल्याचा बदलाही घेतला. यानंतर पाकिस्ताननेही भारताशी भिडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, पाकिस्तान थंड झाला. दरम्यान या दोन्ही देशांतील तणाव अद्यापही कायम आहे. यातच आता, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावात चीनची कितपत भूमिका होती? यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भाष्य केले आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जर्मन वृत्तपत्र 'फ्रँकफर्ट ऑलगेमिंग झीतुंग'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, ''पाकिस्तानकडे असलेली बरेचशी शस्त्रास्त्रे चीनची आहेत. दोन्ही देशांचे संबंधही चांगले आहेत. यावरून आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात.''
पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविराम - परराष्ट्र मंत्रीजयशंकर म्हणाले, ''आम्ही दहशतवादी तळांना लक्ष्य केले. आमचे लक्ष्य अचूक होते आणि हे विचारपूर्वक उचलले गेलेले पाऊल होते. मात्र, यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर गोळीबार सुरू केला. यावर, आम्ही पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करू शकतो, हेही त्यांना दाखवून दिले. यानंतर, त्यांच्या विनंतीवरून गोळीबार थांहबवण्यात आला.भारताने अनेक देशांत पाठवली शिष्टमंडळे -भारताने पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी जगभरात आपले शिष्टमंडळ पाठवले आहेत. एस जयशंकर म्हणाले, पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यित हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याचे मनोबलही खचले आहे. भाषाने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, परराष्ट्रमंत्र्यांनी जगभरात पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी सर्व खासदारांचे सहकार्य मागितले आहे. ते म्हणाले, दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात भारताच्या भूमिकेला अनेक देशांनी पाठिंबा दिला. मात्र, चीन, अझरबैजान आणि तुर्की सारख्या फार कमी देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.