याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:50 IST2025-12-10T13:50:06+5:302025-12-10T13:50:38+5:30
२४ वर्षांचा सतीश खटीक आणि २३ वर्षांचा साजिद मोहम्मद यांचं नशीब अचानक पालटलं.

याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील जमीन अत्यंत भाग्यवान मानली जाते. हिऱ्यांसारख्या मौल्यवान गोष्टींचा खजिना इथे दडलेला आहे. त्यामुळे इथे कधी कोणाचं नशीब कसं चमकेल हे सांगता येत नाही. असंच काहीसं २० दिवसांपूर्वी कृष्णा कल्याणपूर येथे खाणकाम करणाऱ्या दोन मित्रांसोबत घडलं आहे. २४ वर्षांचा सतीश खटीक आणि २३ वर्षांचा साजिद मोहम्मद यांचं नशीब अचानक पालटलं.
सतीश आणि साजिद यांना या वर्षातील सर्वात मोठा आणि चमकणारा १५.३४ कॅरेटचा हिरा मिळाला आहे, जो जेम्स क्वालिटीचा आहे. या हिऱ्याची किंमत सुमारे ५० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही मित्रांनी हा हिरा कार्यालयात जमा केला असून लवकरच त्यांना बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
नशीबवान! ...अन् क्षणात संपली गरिबी; २०० रुपयांने मजुराचं कुटुंब झालं करोडपती; जिंकले १.५ कोटी
दोन्ही मित्र आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मेहनत आणि बहिणींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करत होते. दोघांनी पन्नाच्या हिरा कार्यालयातून खाणकाम करण्याचा परवाना तयार करून घेतला आणि नशीब आजमावण्यास सुरुवात केली. साजिद आणि सतीश दोघांचंही दुकान आहे. साजिदचे आजोबा आणि वडिलांनीही दीर्घकाळ नशीब आजमावलं, पण त्यांना मोठं यश मिळालं नाही.
तरुणांनी अवघ्या २० दिवसांत आपलं नशीब बदललं. हिरा कार्यालयात जमा केलेल्या या अनमोल हिऱ्याचा लिलाव केला जाईल. लिलावातून मिळणारी रक्कम दोघांमध्ये बरोबरीने वाटून घेण्याचा निर्णय या मित्रांनी घेतला आहे. या पैशातून ते सर्वप्रथम बहिणींचं लग्न करणार आहेत आणि उर्वरित रक्कम आपापल्या व्यवसायासाठी वापरतील.