एमके स्टॅलिन यांच्या पुत्राकडून सनातन धर्माची मच्छरशी तुलना; धीरेंद्र शास्त्री संतापले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 14:03 IST2023-09-04T14:02:56+5:302023-09-04T14:03:34+5:30
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका विधानानं वाद चिघळला आहे.

एमके स्टॅलिन यांच्या पुत्राकडून सनातन धर्माची मच्छरशी तुलना; धीरेंद्र शास्त्री संतापले, म्हणाले...
नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या एका विधानानं वाद चिघळला आहे. सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना उदयनिधी यांची तुलना जनावराशी केली आहे.
उदयनिधी हे रावणाच्या घराण्यातील असल्याची टीका धीरेंद्र शास्त्री यांनी केली. "मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन हा रावणाच्या घराण्यातील आहे. भारतात राहणाऱ्या नागरिकानं असं काही बोलून सनातन्यांना मोठी झळ पोहचवली आहे. हा प्रभू श्रीरामाचा देश आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत सनातन धर्म कायम राहिल. अशा जनावरांना उत्तर देण्यात अर्थ नाही", असे धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलं. ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उदयनिधि ‘’रावण’’ के खानदान का है-पूज्य सरकार#bageshwardham#BageshwarDhamSarkarpic.twitter.com/6nqFuGsWND
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) September 4, 2023
मुख्यमंत्री शिंदेंची टीका
उदयनिधी स्टॅलिन यांचा समाचार घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडिया’ आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. काँग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतेय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडिया’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेंचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनी सुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे", असेही शिंदेंनी नमूद केलं.