डीएचएफएलमध्ये ठेवीदारांचे ६ हजार कोटी रुपये अडकले; चिंतेमुळे हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:14 IST2019-11-23T02:10:58+5:302019-11-23T06:14:06+5:30
कर्ज आणि ठेवींची रक्कमच ८३ हजार ९00 कोटी रुपये

डीएचएफएलमध्ये ठेवीदारांचे ६ हजार कोटी रुपये अडकले; चिंतेमुळे हतबल
मुंबई : दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल)ने बँका, विविध वित्तीय संस्था, तसेच सामान्य ठेवीदारांकडून घेतलेल्या कर्ज व ठेवींची रक्कम तब्बल ८३ हजार ९00 कोटी रुपये असून, हे पैसे परत कसे मिळणार, या चिंतेमुळे सारेच हतबल झाले आहेत.
त्यापैकी बँकांकडून घेतलेले कर्ज ३१ टक्क्यांच्या आसपास असून, ती सारी रक्कम बँका बहुधा थकीत वा बुडीत कर्जे म्हणून दाखविण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने डीएचएफएलचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक केली आहे. आता त्याच्या मदतीसाठी तीन सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
तोपर्यंत पैसे मिळणे अशक्यच?
डीएचएफएलवर दिवाळखोरीची कारवाई सुरू होणार असल्याने, या कंपनीने घेतलेली कर्जे व ठेवी यांची परतफेड सहजासहजी होणार नाही. कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यामुळेच लोकांना व बँका, तसेच वित्तीय संस्थांना त्यांच्या रकमा परत मिळणे अशक्यच आहे.
या कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. बँकांची कर्जे न फेडणाऱ्या कंपन्यांवर अशी कारवाई केली जाते. त्यामुळे ती सुरू होईल, पण या कंपनीत सामान्य ठेवीदारांचा हिस्सा केवळ ६ टक्के असला, तरी त्यांच्या ठेवींची रक्कम तब्बल ६ हजार कोटी रुपयांच्या आहेत.
ही रक्कम परत कशी मिळणार, कधी मिळणार वा मिळणार का, असा प्रश्न आहे. त्यामुळे सारे सामान्य ठेवीदार हतबल झाले आहेत. डीएचएफएलबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी ज्यांनी त्या कंपनीला कर्जे दिली आहेत, त्यापैकी ६६ टक्के कर्जदारांची संमती गरजेची आहे. म्हणजेच बँका व वित्तीय संस्था यांनाच त्यात प्राधान्य मिळेल. सामान्य ठेवीदारांचा वाटा अवघा ६ टक्के असल्याने त्यांना कर्जदारांच्या समितीत जागा मिळेल का, ही शंका आहे.