थिरुवनंतपूरम : भ्रष्टाचाराचे कथित आरोप असलेले केरळचे अर्थमंत्री के.एम. मणी यांना अर्थसंकल्प सादर करू न देण्याच्या इरेस पेटलेल्या विरोधकांनी शुक्रवारी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. मणी अर्थसंकल्प मांडण्यात यशस्वी झाले; मात्र गदारोळादरम्यान विरोधी सदस्यांनी अध्यक्षांचे आसन फेकले. वॉच अॅण्ड वार्ड स्टाफसोबत विरोधकांची धक्काबुक्की झाल्याने सभागृहात फ्री स्टाईल पाहायला मिळाली.केरळमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. तसेच डावे आणि भाजप विरोधात आहेत.आज मणी अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहताच विरोधकांनी त्यांना जोरदार विरोध केला. भ्रष्ट मंत्री अर्थसंकल्प मांडू शकत नाहीत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. सभागृहातील मार्शलनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले आणि हाणामारी सुरू झाली. संतप्त विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांचे आसन फेकले शिवाय अन्य साहित्याचीही तोडफोड केली. मारहाणीत माकप नेते आणि माजी मंत्री थॉमस आयजकसह एलडीएफचे काही सदस्य खाली कोसळले. काही सदस्य बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना स्ट्रेचरवरून सभागृहाबाहेर नेण्यात आले. विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघून सत्ताधाऱ्यांनी मणी यांच्याभोवती सुरक्षा कडे निर्माण केले. यादरम्यान मणी यांनी अर्थसंकल्पाचे थोडक्यात वाचन करून तो विधानसभेच्या पटलावर ठेवला.केरळ विधानसभेतील या अभूतपूर्व गोंधळाचे पडसाद शुक्रवारी संसदेतही उमटले. केरळच्या काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत हा मुद्दा उपस्थित केला. (वृत्तसंस्था)
केरळ विधानसभेत धुमश्चक्री
By admin | Updated: March 13, 2015 23:34 IST