Uttarkashi Kalp Kedar Temple Story:उत्तराखंडमधील धराली येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरुन टाकले आहे. या घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, बचाव पथकांनी १३० जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. सध्या धराली गावात लष्कर, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन विभागाचे जवान आपले प्राण धोक्यात घालून बचाव मोहिम राबवत आहेत. या दुर्घटनेत अनेक घरे, हॉटेल्स आणि दुकानांसह एक मंदिरदेखील ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या ऐतिहासिक मंदिराचे नाव 'कल्प केदार' आहे.
स्थानिकाच्या दाव्यानुसार, हे मंदिर खूप प्राचीन आहे. या मंदिराची वास्तुकला केदारनाथ धामसारखी आहे. म्हणूनच त्याचे नाव कल्प केदार आहे. लोक म्हणतात की, ज्याप्रमाणे केदारनाथ धामबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर वर्षानुवर्षे बर्फाखाली गाडले गेले होते, त्याचप्रमाणे कल्प केदार मंदिरदेखील जमिनीखाली गाडले गेले होते.
१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्राचीन मंदिरात १९ व्या शतकापासून पूजा सुरू झाली. असा दावा केला जातो की, १९४५ मध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाला, तेव्हा लोकांना खीर गंगेच्या काठावर मंदिराच्या शिखरासारखी रचना दिसली, म्हणून त्या जागेचे उत्खनन करण्यात आले. अनेक फूट जमीन खोदल्यानंतर हे प्राचीन शिवमंदिर बाहेर आले, ज्याची रचना केदारनाथ मंदिरासारखी होती.
१९४५ मध्ये उत्खननानंतर मंदिर सापडल्यानंतर पूजा सुरू झाली. उत्खननानंतरही मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा खाली होते. भाविक मंदिरात खाली जाऊन पूजा करत असत. लोक म्हणतात की, खीरगंगेचे पाणी अनेकदा मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाजवळ येत असे. आता पुन्हा एकदा ढगफुटीच्या घटनेमुळे हे मंदिर ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे.
१८१६ मध्ये एका इंग्रजी प्रवाशाने याचा उल्लेख केलेला
१८१६ मध्ये गंगा भागीरथीच्या उगमस्थानाचा शोध घेणारे इंग्रजी प्रवासी जेम्स विल्यम फ्रेझर यांनी त्यांच्या कथेत याचा उल्लेख केला आहे. जेम्स विल्यम फ्रेझर यांनी धरालीच्या मंदिरांमध्ये विश्रांती घेण्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर १८६९ मध्ये गोमुखला पोहोचलेले इंग्रजी छायाचित्रकार आणि संशोधक सॅम्युअल ब्राउन यांनीदेखील धरालीतील तीन प्राचीन मंदिरांचे फोटो काढले, जे पुरातत्व विभागाकडे सुरक्षित आहेत. काही लोक म्हणतात की, हे मंदिर आदि शंकराचार्यांनी बांधले होते. तर काही म्हणतात की, येथे असलेले शिवलिंग पांडवांनी केदारनाथला आल्यावर स्थापित केले होते.