‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:42 IST2025-11-03T13:41:13+5:302025-11-03T13:42:37+5:30
जाहीर सभेत दिले ‘मोदी गॅरंटी’चे दाखले

‘विकसित बिहार’ म्हणजे युवकांना रोजगार, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त होणार: पंतप्रधान मोदी
आरा: बिहार हा विकसित भारताचा पाया असून ‘विकसित बिहार’ याचा अर्थ म्हणजे राज्यातील युवकांना येथेच रोजगार उपलब्ध करून देणे होय. आता हे युवक येथेच काम करतील आणि राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतील, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
येथे आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणाले, आगामी काही वर्षांत एक कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सूक्ष्म, लघू तसेच मध्यम उद्योगांसह कुटिरोद्योगांच्या जाळ्याचा विस्तार केला जाईल. या माध्यमातून बिहार पूर्व भारतातील वस्त्र व पर्यटनाच्या दृष्टीने प्रमुख केंद्र ठरेल, अशी हमी पंतप्रधानांनी या वेळी दिली.
ही मोदींची गॅरंटी आहे
एनडीएचे हेच ट्रॅक रेकॉर्ड आहे. मोफत रेशनची गॅरंटी मी दिली होती आता लोकांना मोफत धान्य मिळत आहे. गरिबांना घरे देण्याचा शब्दही आम्ही पूर्ण केला, असे मोदी यांनी नमूद केले.
दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारू, ही गॅरंटी
मी जम्मू-काश्मीरमधून कलम-३७० रद्द करण्याची गॅरंटी दिली होती. ती आम्ही पूर्ण केली. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारू, ही गॅरंटी आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पूर्ण केली. लष्करात वन रँक वन पेन्शनची हमी आम्ही दिली, ती पण पूर्ण केली. कारण बिहारचे हजारो लोक आज लष्करात सेवा देत आहेत.