भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार
By मोरेश्वर येरम | Updated: January 12, 2021 17:18 IST2021-01-12T17:16:36+5:302021-01-12T17:18:38+5:30
सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून रुग्ण दाखल

भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार
नवी दिल्ली
दिल्लीत काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर सुरू होता. पण आता हळूहळू चित्र पालटलं आहे. दिल्लीत कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी छत्तरपूर येथे देशातील सर्वात मोठे सरदार पटेल जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे, इंडो-तिबेटीयन पोलिसांकडून (आयटीबीपी) येथे रुग्णांना सेवा दिली जात होती.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना या कोविड सेंटरमध्येही आता खाटा रिकाम्या होऊ लागल्या आहेत. "सरदार पटेल कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कोविड सेंटरमध्ये सध्या ६० रुग्ण असून त्यासाठी ६०० डॉक्टरांची फौज कार्यरत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने या कोविड सेंटरमध्ये परदेशी रुग्णांवर उपचार करण्याचे ठरवले आहे", असं 'आयटीबीपी'च्या अधिकाऱ्याने सांगितले.
सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता हळूहळू या सेंटरमधील डॉक्टरांचीही संख्या कमी केली जात आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झालेला नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. परदेशी रुग्णांमध्ये सौदी अरेबियाच्या ८, दुबईच्या ४, कॅनडाच्या ३ आणि अमेरिका, जपान, मलेशिया, नेदरलँड, म्यानमारच्या प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे.
भारतातील रुग्ण संख्येत मोठी घट
सात महिन्यांनतर भारतात बुधवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे १२,५८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी भारतात दिवसाला एका दिवसात ५० हजार नवे रुग्ण आढळून येत होते.
देशात गेल्या २४ तासांत एकूण १८, ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १,५१,३२७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.