Delhi Violence: ढिगाऱ्यांमध्ये सापडत आहेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 02:28 IST2020-02-28T02:27:04+5:302020-02-28T02:28:07+5:30
पोलिसांनी काही श्वानांच्या मदतीने मृतदेह हुडकून काढण्याचे काम हाती घेतले आहे.

Delhi Violence: ढिगाऱ्यांमध्ये सापडत आहेत मृतदेह
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात नेमक्या किती जणांना प्राण गमवावा लागला, याचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्यानंतर गुरुवारी पुन्हा एक शव पोलिसांना मिळाले. यामुळे या हिंसाचारात नेमक्या किती जणांचा जीव गेला, याचा कयास लावणे आता पोलिसांनाही कठीण जात आहे. पोलिसांनी काही श्वानांच्या मदतीने मृतदेह हुडकून काढण्याचे काम हाती घेतले आहे.
ईशान्य दिल्ली या हिंसाचाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. गुरुवार दुपारपर्यंत या हिंसाचारात ३७ जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले तरी मृतांचा आकडा वाढतच आहे. आता स्थिती आटोक्यात असली तर ढिगारे व नाल्यांमधून मृतदेह मिळत असल्याने हिंसाचारामधील भयाण चित्र समोर येत आहे. गुरुवारला गगनपुरीतील नाल्यात दोन मृतदेह सापडले. या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. बुधवारला याच नाल्यात गुप्तचर विभागाचा कॉन्स्टेबल अंकित शर्माचा मृतदेह मिळाला होता. अंकित शर्मा याला ठेचून मारल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशमन दलाकडे तक्रारींचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही. रात्रभरात अग्निशमन विभागाकडे १९ लोकांनी मदत मागितल्याचे दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.