दिल्लीतील एका १९ वर्षीय मुलाला मोबाईलवर गेम खेळणं महागात पडलं आहे. गेम खेळण्याच्या नादात तो तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ खोलीत एकटाच राहायचा. याचा त्यांच्या आरोग्याला मोठा फटका बसला आहे. पाठीच्या कण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, त्याने ब्लॅडरवरचा कंट्रोल गमावला. पाठीच्या कण्यावर जास्त दाब आल्याने शेवटी सर्जरी करावी लागली आहे.
जवळपास एका वर्ष तो दररोज तब्बल १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा. यामुळे त्याला स्पाइनल ट्यूबरक्लोसिस (टीबी) झाला. याचं वेळीच निदान न झाल्याने त्याची प्रकृती आणखी बिघडली. जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याला चालायला आणि लघवी करायला देखील त्रास होत होता. इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटर (ISIC) मधील डॉक्टरांना त्याच्या मणक्यात गंभीर गोष्ट आढळली, जी काइफो-स्कोलियोसिस नावाची धोकादायक स्थिती आहे.
स्कॅनमध्ये असं दिसून आलं की, टीबीने त्याच्या पाठीच्या दोन हाडांना (D11 आणि D12) संसर्गित केलं होतं, ज्यामुळे पू तयार झाला आणि पाठीच्या कण्यावर दाब आला. "ही एक आव्हानात्मक केस होती कारण त्यात स्पाइनल टीबी आणि दीर्घ असलेल्या गेमिंग व्यसनाचा परिणाम होता" असं आयएसआयसीमधील स्पाइन सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. विकास टंडन यांनी इंडिया टुडेला सांगितलं.
मुलाची ही समस्या दूर करण्यासाठी, मेडिकल टीमने स्पायनल नेव्हिगेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला, ही एक प्रगत टेक्नॉलॉजी आहे. सर्जरीनंतर काही दिवसांतच मुलामध्ये बरं होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तो पुन्हा चालायला लागला, हे त्याच्या पाठीच्या कण्यावरील दाब कमी झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे आरोग्याची नेहमीच काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी सर्वांनाच दिला आहे.