Delhi stampede news marathi: 'आम्ही प्रयागराजला जाण्यासाठी निघालो होतो. रेल्वे स्थानकावर पोहोचलो. त्यावेळी तिथली परिस्थिती भयावह होती. प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. मग आम्ही परत घरी जाण्याचा विचार करत होतो अन् तितक्यात गोंधळ उडाला. आम्ही दबलो गेलो. माझ्या नणंदेचा तिथेच मृत्यू झाला." नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतून थोडक्यात वाचलेल्या एका महिलेसोबत घडलेला हा भयंकर प्रसंग. तिच्या कुटुंबीतील एका व्यक्तीने हात धरून बाहेर ओढल्याने थोडक्यात बचावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अक्षरशः मृत्यूने तांडव घातले. प्रयागराज एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म ऐनवेळी बदलण्यात आल्याने गोंधळ उडाला आणि महिला, लहान मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला.
तिच्या तोंडातून फेस आला अन्...
महिलेने सांगितले की, "प्लॅटफॉर्मवरील गर्दी बघून आम्ही परत घरी जायच्या विचारात होतो. त्याचवेळी गोंधळ झाला आणि धावपळ सुरू झाली. अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. माझी नणंद आमच्यासोबत होती. तिचा हात सुटला आणि ती गर्दी दबली गेली. आम्ही तिला उठवण्याचा प्रयत्न केला. सारखे आवाज दिले. पण, तिच्या तोंडातून फेस यायला लागला. तिचा तिथेच मृत्यू झाला."
चेंगराचेंगरी होण्यापूर्वी रेल्वे स्थानकावरील गर्दीचा व्हिडीओ
माध्यमांशी बोलताना महिला म्हणाली, "आम्ही कुटुंबातील सगळे एकमेकांचा हात धरून चाल होतो. पण, धावपळ सुरू झाली आणि नणंदेचा हात सुटला. ती मागेच राहिली. मला माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीने बाहेर ओढलं. आम्ही अर्धा तास तिथे दबलो होतो. श्वासही घेता येत नव्हता."
'गर्दी टाळण्यासाठी अजिबात व्यवस्था नव्हती'
"नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. आमच्या घरातील एकूण १२ लोक निघाले होते. काही जण आधीच रेल्वे स्थानकावर पोहोचलेले होते. त्यांनी आम्हाला एका बाजूने येण्यास सांगितले. त्यांनी जर आम्हाला सांगितले असते की, खूप गर्दी आहे. तर आम्ही गेलोच नसतो", असे महिलेने सांगितले.
"अधिकारी कर्मचारीही नव्हते. पोलीसही दिसत नव्हते. माझा मोबाईल हरवला. पैसेही हरवले. अनेक लोकांचा माझ्यासमोर मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांचे जीव घेतले", असे ही महिला म्हणाली.