मोदी द्वेषाचं वातावरण तयार करताहेत! PMOसाठी टेबल तयार करण्यास डिझायनरचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:31 IST2022-04-18T13:28:02+5:302022-04-18T13:31:34+5:30
पंतप्रधान मोदींसाठी टेबल तयार करण्यास डिझाईनरचा नकार; एफआयआर दाखल

मोदी द्वेषाचं वातावरण तयार करताहेत! PMOसाठी टेबल तयार करण्यास डिझायनरचा नकार
दिल्ली: पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका डिझायनरनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं एफआयआर नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयासाठी खास टेबल डिझाईन करण्यासाठी एका व्यक्तीनं संपर्क साधा होता. पंतप्रधानांचं खासगी सचिव म्हणून संबंधितानं मेल केला होता, असा दावा डिझायनरनं सोशल मीडियावर केला होता.
दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थानानं ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली. त्यात त्यांनी डिझायनर आणि बोगस अधिकाऱ्यामध्ये मेलवरून झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. कुणाल मर्चंट नावाच्या एका डिझायनरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. विवेक कुमार नावाच्या व्यक्तीनं आपल्याशी संपर्क साधला होता. आपण पंतप्रधान मोदींचे खासगी सचिव असून पंतप्रधानांसाठी खास टेबल डिझाईन करायचं असल्याचं कुमारनं सांगितलं होतं, असं मर्चंट यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.
विवेक कुमारनं त्यांच्या मेलमध्ये एक एक्झिक्युटिव्ह टेबल डिझाईन करण्यास सांगितलं होतं. या टेबलचा वापर पंतप्रधान मोदी करणार होते. कुमारनं मेलमध्ये एक नंबर शेअर केला होता. माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा. प्लान आणि डिझाईनबद्दल बोलू, असं कुमारनं मर्चंट यांना सांगितलं होतं.
कुणाल मर्चंट यांनी ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला. राजकीय आणि वैचारिक मतभेद असल्यानं आपण प्रस्ताव नाकारल्याचा उल्लेख त्यात होता. हे मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यांच्या एका टीमनं कुणाल यांच्याशी संपर्क साधला.
मी गांधीवादी आहे. अहिंसेवर माझा विश्वास आहे. ज्या टेबलवर अल्पसंख्याकांविरोधात निर्णय घेतले जाणार आहेत, त्याबद्दलच्या निर्णयांवर, आदेशांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत, त्यासाठीचं टेबल मी तयार करणार नाही, असं मर्चंट यांनी मेलमध्ये म्हटलं. मोदी सरकार द्वेषपूर्ण वातावरण तयार करत असल्याचं त्यांनी मेलमध्ये म्हटलं आहे.