अरविंद केजरीवालांवर स्टँप ड्युटी चोरीचा आरोप, नायब राज्यपालांनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 21:30 IST2022-09-07T21:28:29+5:302022-09-07T21:30:36+5:30
Stamp Duty Evasion Case: दिल्लीतील नायब राज्यपाल व्हीके सक्सेना आणि आप (आप) यांच्यात सुरू झालेला संघर्ष आता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता एलजीने केजरीवाल यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.

अरविंद केजरीवालांवर स्टँप ड्युटी चोरीचा आरोप, नायब राज्यपालांनी दिले चौकशीचे आदेश
Stamp Duty Evasion Case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ४.५४ कोटी रुपयांना तीन भूखंड विकल्याचा आणि त्यांची कागदावर किंमत केवळ ७२.७२ लाख रुपये दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहेत. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाच्या हवाल्यानं ही माहिती मिळाली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या मदतीने त्यांनी ४५,००० रुपये प्रति चौरस यार्ड या बाजारभावाने भूखंड विकले, परंतु व्यवहाराच्या कागदपत्रांवर प्रति चौरस यार्ड ८,३०० रुपये दाखवल्याचाही आरोप करण्यात आलाय.
एवढेच नाही तर अरविंद केजरीवाल यांच्यावर २५.९३ लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्क चोरीचा आरोपही करण्यात आला होता. ही तक्रार लोकायुक्तांमार्फत नायब राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आली होती. यामध्ये त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. आता नायब राज्यपाल हीके सक्सेना यांनी हे प्रकरण मुख्य सचिवांकडे पाठवलं आहे.
दिल्लीत नायब राज्यपाल व्हीके सक्सेना आणि आम आदमी पार्टी यांच्यात सुरू झालेला संघर्ष कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दोघेही एकमेकांवर सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. मद्याच्या घोटाळ्यापासून सुरू झालेल्या या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहे. वास्तविक, नायब राज्यपालांनीच नवीन उत्पादन शुल्क धोरणाविरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. मुख्य सचिवांच्या अहवालानंतर ही शिफारस करण्यात आली होती. नवीन उत्पादन शुल्क धोरणातील नियमांकडे दुर्लक्ष करून निविदा दिल्याचे अहवालात म्हटले आहे. तेव्हापासून आम आदमी पार्टी आणि उपराज्यपाल यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे.