पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाला दिल्ली आमदारांचा पगार
By Admin | Updated: December 4, 2015 11:10 IST2015-12-04T09:36:36+5:302015-12-04T11:10:22+5:30
दिल्लीतील आमदारांच्या पगारात तब्ब्ल ४०० टक्क्यांची वाढ करण्याचे विधेयक मंजूर झाल्याने त्यांना आता पंतप्रधानांपेक्षाही जास्त पगार मिळणार आहे.

पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाला दिल्ली आमदारांचा पगार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांची वाढ सुचवणारे वेतन वाढीचे विधेयक काल दिल्ली विधानसभेत मंजूर झाले असून आता दिल्लीतील आमदारांचा पगार हा पंतप्रधानांपेक्षाही जास्त झाला आहे. या विधेयकामुळे आता दिल्लीतील आमदारांना दरमहा ८८ हजारांऐवजी तब्बल दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच आमदारांचे पेन्शन व विविध भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे.
या विधेयकामुळे दिल्ली आमदारांचा बेसिक पगार १२ हजारांवरून ५० हजार इतका झाला असून त्यांचे महिन्याचे पॅकेज २ लाख १० हजार रुपये इतके होईल. तसेच मंत्र्यांच्या पगारातही वाढ झाली असून त्यांचा बेसिक पगार आता २० हजारांवरून ८० हजार इतका झाला आहे. यापूर्वी आमदारांना देशांतर्गत दौ-यांसाठी भत्ता दिला जात असे, मात्र या विधेयकानुसार आमदारांना आता परदेश दौ-यांसाठी भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या पगारात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार आहे.
दरम्यान भाजपने या वेतनवाढीचा विरोध करत सभात्याग केला.