वकील-पोलीस मारहाण प्रकरण : दिल्ली हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 06:37 PM2019-11-03T18:37:09+5:302019-11-03T18:37:24+5:30

पार्किंगच्या मुद्द्यावरून तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये झालेली मारहाण, जाळपोळ, गोळीबार या घटनांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली.

Delhi inquiry into violence | वकील-पोलीस मारहाण प्रकरण : दिल्ली हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

वकील-पोलीस मारहाण प्रकरण : दिल्ली हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

Next

नवी दिल्ली : पार्किंगच्या मुद्द्यावरून तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये झालेली मारहाण, जाळपोळ, गोळीबार या घटनांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली. याप्रकरणी रविवारी तातडीची सुनावणी घेत केंद्र सरकार, पोलीस आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव यांना नोटीस बजावली. या घटनेची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकामार्फत केली जाणार असून निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचेही आदेश देण्यात आले. हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून एका पोलीस उप निरीक्षकाला निलंबित करण्याचे तर एका पोलिसाच्या बदलीचे निर्देश न्यायालयाने दिले.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल यांनी याप्रकरणी माध्यमांतील बातम्या, पोलीस अधिका-यांची साक्ष-यांच्या आधारे स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायाधीश सी. हरि शंकर यांच्या खंडपीठासमोर राहुल मेहरा यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडली. मारहाणीत २१ पोलीस आणि ८ वकील जखमी झाल्याचे मेहरा यांनी सांगितले. या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली. वकिलांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चौकशीच्या काळात विशेष पोलीस आयुक्त संजय सिंग आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरिंदर सिंग यांची बदली करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले.

शनिवारी दुपारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे २० पोलीस आणि १० वकील जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीपेक्षा अधिक सहकारी या हिंसाचारात जखमी झाल्याचा दावा वकिलांनी केला आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे म्हटले आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दिल्ली सरकारचे मुख्य सचिवही उपस्थित होते. बैठकीनंतर न्यायालयाने याप्रकरणी दुपारी एक वाजता सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. बार काऊंसिल ऑफ इंडियाने नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र पाठवून या प्रकरणी दोषी पोलिसांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, घटनेनंतर न्यायाधीशांनी रुग्णालयात जाऊन जखमी वकिलांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.    
     
जखमी वकिलांना मदत जाहीर
पोलिसांसोबत मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोन वकिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिल्ली बार काऊंसिलने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमी वकिलांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. काऊंसिलचे अध्यक्ष के.सी. मित्तल यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

अमित शहा यांनी माफी मागावी - काँग्रेस
वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वकिलांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या घटनेला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ही घटना म्हणजे भाजपची क्रूरता, अहंकार आणि कायद्याला सन्मान ने देण्याच्या कृतीचाच हा परिणाम असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

Web Title: Delhi inquiry into violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.