Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची सत्ता उलथून लावण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने आज(17 जानेवारी ) आपले संकल्प पत्र जारी केले आहे. हे सकंल्प पत्र जारी करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आपल्याला संकल्पाकडून सिद्धीकडे वाटचाल करायची आहे. दिलेली आश्वासने पाळण्यात आम्ही अव्वल आहोत. विकसित दिल्लीच्या पायाभरणीचे हे संकल्प पत्र आहे. दिल्लीच्या सर्व योजना सुरू राहतील. झोपडपट्टीवासीयांनाही आम्ही मुख्य प्रवाहात आणू, असे नड्डा यावेळी म्हणाले.
आपल्या संकल्प पत्राच्या पहिल्या भागात भाजपने महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जातील, असे आश्वासन भाजपने दिले आहे. 'महिला समृद्धी योजना', असे या योजनेचे नाव असून, सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत योजना मंजूर केली जाईल. आमचे सरकार आल्यावर गर्भवती महिलांना 21000 रुपये देण्याची तरतूद करणार असल्याचे नड्डांनी सांगितले.
नड्डा पुढे म्हणतात, आज 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजना भाजप सरकार आल्यावरही सुरूच राहतील. आज मी जे मुद्दे मांडणार आहे, ते विकसित दिल्लीचा पाया रचतील. महिला सक्षमीकरणाला आमचे प्राधान्य असेल. समाजातील प्रत्येक घटकावर आमचे लक्ष असेल. होळी-दिवाळीला प्रत्येकाला एक सिलिंडर मोफत दिला जाईल.
भाजपच्या संकल्प पत्रातील प्रमुख मुद्दे
- महिला समृद्धी योजने अंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जातील.
- गर्भवती महिलांना 21000 रुपये दिले जातील.
- होळी-दिवाळीला प्रत्येकी एक सिलिंडर मोफत दिला जाईल.
- 500 रुपये एलपीजी सबसिडी दिली जाईल.
- गर्भवती महिलांना पोषण किट दिले जातील.
- 5 लाख रुपयांपर्यंतचा अतिरिक्त आरोग्य विमा दिला जाईल.
- दिल्लीत आयुष्मान भारत योजना राबवणार.
- अटल कॅन्टीन योजना सुरू करणार. झोपडपट्ट्यांमध्ये पाच रुपयांना रेशन दिले जाणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाईल.
'आप'नेही दिली आश्वासने
मोफत शिक्षण, 20 हजार लिटर मोफत पाणी, 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन देण्यासोबतच आम आदमी पक्षाने चुकीच्या पाण्याच्या बिलांवर वन टाईम सेटलमेंट योजना आणण्याचे आश्वासनही दिले आहे. दिल्लीतील सत्ताधारी पक्षाने 60 वर्षांवरील व्यक्तींना संजीवनी योजनेंतर्गत खासगी आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचार, पुजारी-ग्रंथी योजनेंतर्गत पुजारी व ग्रंथींना दरमहा 18 हजार रुपये आणि महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना मोफत उपचार आणि दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसच्या पाच गॅरंटीदिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच गॅरंटी दिल्या आहेत. महागाई निवारण योजनेंतर्गत मोफत रेशन किट, 500 रुपयात गॅस सिलिंडर आणि 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याशिवाय, प्यारी दीदी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपये, जीवन रक्षा योजनेंतर्गत 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार, युवा उडान योजनेंतर्गत मासिक 8500 रुपये आणि तरुणांना एक वर्ष प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.