दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. तसेच त्यामध्ये ४८ जागांवर आघाडी घेत भाजपाने विजय निश्चित केला आहे. तर मागच्या १० वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाची २२ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. दिल्लीतील निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर इंडिया आघाडीमधील नेते आणि काँग्रेसकडून आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना दिल्लीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आम आदमी पक्षाला विजय मिळवून देण ही काही आमची जबाबदारी नाही, असं विधान केलं आहे.
काँग्रेस आपच्या सोबत असती तर असा निकाल लागला नसता, असं आप आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून वारंवार सांगण्यात येतंय, असं विचारलं असता सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत, आम्हीही राजकीय पक्ष आहोत, असे श्रीनेत यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये आमचं राजकीय अस्तित्व आहे आणि आपण स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे, अशा विचार आम्ही केला होता. आता कोण काय म्हणतं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मला वाटतं की आम्ही चांगला प्रचार केला. आम आदमी पक्ष हा त्यांच्या अपयशामुळे पराभूत झाला आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये सलग तिसऱ्यांदा काँग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही. २०१३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ८आमदार निवडून आले होते. मात्र २०१५ आणि २०२० साली झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता. दरम्यान, यावेळी काँग्रेसने जोरदार प्रचार मोहीम राबवल्याने काँग्रेसला काही जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळीही काँग्रेसचं खातं उघडू शकलं नाही.