Delhi Election 2025 : दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मैदानात उतरले आहेत. ते दिल्लीतील विविध मतदारसंघात सभा घेत असून, सत्ताधारी आपसह काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, दोघेही आपल्या मतदारसंघात पराभूत होणार असल्याचा दावा अमित शाहांनी आज केला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 नंतर देशात पहिली गरीब कल्याण योजना आणली. उपचार योजना असो, मोफत घर असो, शौचालय असो, रेशन असो, गॅस सिलिंडर असो. हे सर्व भाजपने आणले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून केजरीवालांनी फुकटच्या योजना आणल्या. भाजपने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि गरीब कल्याणकारी योजना राबवल्या.
दिल्लीत भाजपचा विजय झाला तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, अरविंद केजरीवाल स्वत: नवी दिल्लीतून हरणार आहेत. आतिशीही त्यांच्या मतदारसंघात पराभूत होत आहेत. सध्या आमचा अजेंडा जिंकण्याचा आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हा निर्णय नंतर घेतला जाईळ. सर्व 70 लोकांना आपण मुख्यमंत्री होऊ शकतो असे वाटते. कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, असे शाह यावेळी म्हणाले.
यमुनेच्या मुद्द्यावर दिले उत्तर भाजपचा दिल्लीतील राजकीय वनवास संपणार आहे का? यावर शाह म्हणाले की, खोटे बोलणे फार काळ टिकत नाही. केजरीवाल सरकारची 10 वर्षे झाली. आता हे खोटे उघड झाले आहे. त्यांनी ज्या प्रकारे दिल्लीत अशांतता निर्माण केली आहे, सर्वत्र अराजकता पसरवली, जनता हे सर्व पाहत आहे. भाजपचे हरियाणा सरकार यमुनेमध्ये विष मिसळत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. यावर अमित शाह म्हणाले की, विष मिसळले, त्याच्या चाचणीचा अहवाल कुठे आहे? त्यांना खोटे बोलून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते जनतेला घाबरवून आणि दहशत पसरवून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. हरियाणा सरकारदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.