Corona Vaccination: दिल्लीत २४ तास चालणार लसीकरण; मुख्यमंत्री केजरीवालांचं मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 06:47 IST2021-04-06T06:46:14+5:302021-04-06T06:47:04+5:30
दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात.

Corona Vaccination: दिल्लीत २४ तास चालणार लसीकरण; मुख्यमंत्री केजरीवालांचं मोदींना पत्र
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने राज्यात ६ एप्रिलपासून सरकारी रुग्णालयांत रात्रीही कोरोना लसीकरण करण्याचे ठरवले आहे.
दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जे लोक आरोग्य सेतूसारख्या पोर्टलच्या माध्यमातून आधीच स्लॉट बुक करतात त्यांना प्राधान्य दिले जाते. लसीकरण साइट या सहा तासांसाठी जवळपास १०० स्लॉट सुरक्षित ठेवतात. दुपारी तीननंतर सगळ्या साइट्स ऑन-द-स्पॉट रजिस्ट्रेशन आणि लसीकरणासाठी खुल्या केल्या जातात. दिल्लीत सोमवारपर्यंत १५,८३,०४७ जणांना लस दिली गेली. येथे रोज ६० ते ८० हजार लोकांना लस दिली जात आहे. दिल्लीत कोरोनाचे एकूण ६,७६,४१४ रुग्ण आहेत. त्यातील ६,५१,३५१ लोक बरे झाले असून, सक्रिय रुग्ण १३,९८२ आहेत. कोरोनाने दिल्लीत आतापर्यंत ११ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत आयसीयू बेडची संख्या वाढवली आणि लसीकरणाची वेळ वाढवल्यामुळे जास्त लोकांना लाभ मिळेल.
अटी आणि शर्तींत सूट द्या
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोनाचा वाढता फैलाव पाहून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.
त्यात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या अटी आणि शर्तींत सूट आणि लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकण्याची मागणी केली आहे.
केजरीवाल म्हणाले की, लसीकरण मोहीम आणखी वेगाने पुढे न्यावी लागेल. नवी लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियम सरळ केले जावेत, कारण आतापर्यंतच्या लसीकरणाने हे सिद्ध केले आहे की, ही लस सुरक्षित आहे.
लसीकरणाचे नियम सरळ करून सगळ्यांना लस देण्याची परवानगी दिली जावी. परवानगी मिळाल्यास दिल्ली सरकार सर्व दिल्लीवासीयांना तीन महिन्यांत लस देऊ शकेल, असेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले.