"लहान कपडे घालणे गुन्हा नाही"; दिल्ली न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:55 IST2025-02-11T19:54:52+5:302025-02-11T19:55:18+5:30
दिल्लीतील न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता करत पोलीस अधिकाऱ्याला फटकारलं आहे.

"लहान कपडे घालणे गुन्हा नाही"; दिल्ली न्यायालयाने सात महिलांची निर्दोष मुक्तता केली
Delhi Court: दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने नुकतीच सात महिलांची निर्दोष मुक्तता केली ज्यांच्यावर गेल्या वर्षी एका बारमध्ये अश्लील नृत्य आणि लोकांना त्रास देण्याचा आरोप होता. याप्रकरणी दिल्लीच्या पहाडगंज पोलीस ठाण्यात महिलांवर भादंवि कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी करताना तीस हजारी कोर्टाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नीतू शर्मा यांनी या खटल्यात कोणताही गुन्हा घडल्याचे सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरल्याचे म्हटलं.
आता ना लहान कपडे घालणे हा गुन्हा आहे ना गाण्यांवर नाचण्यासाठी कोणतीही शिक्षा नाही. जरी ते नृत्य सार्वजनिक ठिकाणी केले जात असेल तरी. डान्सरला शिक्षा तेव्हाच होऊ शकते जेव्हा तिच्या नृत्यामुळे इतरांना त्रास होतो, असं न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हटलं. पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मी परिसरात गस्त घालत असताना बारच्या आत गेल्यावर काही महिला लहान कपडे घालून अश्लील गाण्यांवर नाचत असल्याचे पाहिले, असा तक्रारदाराचा आरोप होता.
"पोलीस अधिकाऱ्याने असा दावा कुठेही केलेला नाही की या नृत्यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीला त्रास झाला. फिर्यादीच्या दोन साक्षीदारांनी सांगितले की ते मौजमजेसाठी त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांना या खटल्याबद्दल काहीही माहिती नाही. यात पोलीस अधिकाऱ्याने एक कथा रचल्याचे स्पष्ट झालं आहे. पण साक्षीदारांनी त्याला साथ दिली नाही. आम्ही त्यांचा दावा मान्य केला तरी तो गुन्हा सिद्ध होणार नाही," असंही कोर्टानं सांगितले. तसेच पोलीस अधिकारी त्यावेळी गस्तीवर होता याचा कुठलाही पुरावा नसल्याचे कोर्टाने म्हटलं.
दरम्यान, कोर्टाने बारच्या व्यवस्थापकाची देखील निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम १४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर कोर्टाने संबंधित रेस्टॉरंट्स आणि बार योग्य परवान्याशिवाय किंवा सरकारने जारी केलेल्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचा कोणताही आरोप नसल्याचेही कोर्टानं म्हटलं.