दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीतील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राम लीला मैदानावर होणार असून, तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यासाठी ३० हजार खुर्च्या मैदानात लावण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यासाठी तीन व्यासपीठ तयार केले जाणार आहे. एक व्यासपीठ ४०×२४ आकाराचे असणार आहे. तर दोन व्यासपीठं ३४×४० असणार आहेत. व्यासपीठावर जवळपास १०० ते १५० खुर्च्या लावल्या जाणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य माणसांसाठी ३० हजार खुर्च्या लावण्यात येणार आहे.
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? गुढ कायम
भाजपमधील सूत्रांनी शपथविधी सोहळ्याची सर्व माहिती दिली. पण, दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याबद्दलचे गुढ अद्याप कायम आहे. भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्रिपदासाठी कोणती नावे शर्यतीत?
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर असलेले पहिले नाव आहे प्रवेश वर्मा यांचं! प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.
दुसरे नाव आशिष सूद यांचे आहे. ते दिल्ली भाजपचे महासचिव आहेत, त्याचबरोबर जनकपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. सूद यांचे भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत.
रोहिणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजेंदर गुप्ता यांचे नावही चर्चेत असून, ते दिल्ली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. दिल्लीचे माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
वैश्य समुदायातून येणारे जितेद्र महाजन यांचे नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. शिखा रॉय, या ग्रेटर कैलास मतदारसंघाचे आमदार असून, आपच्या सौरभ भारद्वाज यांचा त्यांनी पराभव केला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्या एकमेव महिला चेहरा आहेत.