Arvind Kejriwal : "माझं शरीर जेलमध्ये, पण आत्मा जनतेमध्ये"; अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पाठवला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 19:21 IST2024-03-27T19:04:08+5:302024-03-27T19:21:26+5:30
AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल बुधवारी पुन्हा एकदा दिल्ली आणि देशवासीयांसाठी संदेश घेऊन आल्या आहेत.

Arvind Kejriwal : "माझं शरीर जेलमध्ये, पण आत्मा जनतेमध्ये"; अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा पाठवला संदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल बुधवारी पुन्हा एकदा दिल्ली आणि देशवासीयांसाठी संदेश घेऊन आल्या आहेत. ईडीच्या ताब्यात असूनही मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्लीतील जनतेची कशी काळजी वाटत आहे, हे त्यांनी सांगितलं. सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला आहे की, "माझे शरीर जेलमध्ये आहे, पण माझा आत्मा जनतेमध्ये आहे. डोळे बंद करा, मी तुमच्या अवतीभवती असल्याची जाणीव होईल."
"मुख्यमंत्र्यांना डायबेटीस आहे आणि त्यांची शुगर लेव्हल बरोबर नाही, तरीही त्यांचा निर्धार पक्का आहे. केजरीवाल यांनी मला सांगितलं की, दोन वर्षांत अडीच हजार छापे टाकूनही ईडीला एक पैसाही मिळाला नाही. 28 मार्च रोजी न्यायालयात मुख्यमंत्री पुराव्यासह तथाकथित दारू घोटाळ्याबाबत खुलासा करणार आहेत आणि पैसा कुठे आहे हे सांगणार आहेत."
सुनीता केजरीवाल मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी ईडी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला दोन महत्त्वाचे संदेश पाठवले. मुख्यमंत्र्यांचा संदेश प्रेसद्वारे जनतेपर्यंत पोहोचवताना सुनीता केजरीवाल म्हणाल्या, मी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
"अरविंद केजरीवाल यांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली की, या तथाकथित दारू घोटाळ्याच्या तपासात ईडीने गेल्या 2 वर्षांत 2500 हून अधिक छापे टाकले आहेत. ते या तथाकथित दारू घोटाळ्यातील पैशांचा शोध घेत आहेत परंतु आतापर्यंतच्या एकाही छाप्यात त्यांना एक पैसाही सापडलेला नाही. त्यांनी मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांच्या घरांवरही छापे टाकले पण त्यांना एक पैसाही मिळाला नाही."
"ईडीने आमच्या घरावरही छापा टाकला, त्यात त्यांना फक्त 73 हजार रुपये सापडले, त्यामुळे प्रश्न पडतो की मग या दारू घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 28 मार्चला न्यायालयासमोर याचा खुलासा करणार आहेत. या दारू घोटाळ्यातील पैसा कुठे आहे? याचं सत्य ते पुराव्यासह संपूर्ण देशाला सांगतील" असं देखील सुनीता केजरीवाल यांनी म्हटलं आहे.