दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:03 IST2025-11-14T08:46:50+5:302025-11-14T10:03:29+5:30
सुरक्षा दलांनी आयईडीचा वापर करून डॉ. उमरचे संपूर्ण घर जमीनदोस्त केले.

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
Dr. Umar Mohammad House Demolished: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधारावर सुरक्षा दलांनी कठोर कारवाई केली आहे. स्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याच्या पुलवामा येथील घरावर गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी आयईडीचा वापर करून नियंत्रित स्फोट घडवून आणला आणि संपूर्ण घर जमीनदोस्त केले. दहशतवादी कारवायांना कठोर संदेश देण्यासाठ मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात डॉ. उमर मोहम्मद स्वतः मारला गेला. या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या संपूर्ण 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल' चा पर्दाफाश झाला आहे. या दहशतवादी कटात डॉ. उमरसह अनेक उच्चशिक्षित डॉक्टर सामील होते. आतापर्यंत या कटात सामील असलेल्या डॉ. मुजम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहीद यांच्यासह अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
स्फोटानंतर गुरुवारी फरिदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये आणखी एक संशयित मारुती ब्रेझा कार सापडली आहे. ही कार अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदच्या नावावर नोंदणीकृत आहे. डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुजम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी संपूर्ण कटाची योजना एका एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग ॲप द्वारे बनवली होती आणि त्याच ॲपद्वारे संवाद साधत होते.
तपासाअंतर्गत हरियाणातील नूंह येथेही तपास पथकाने छापेमारी केली असून, एका खत विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांनी याच दुकानातून मोठ्या प्रमाणात एनपीके खत जे स्फोटके बनवण्यासाठी वापरले जाते खरेदी केल्याचा संशय आहे. दहशतवाद्यांनी आयईडी नेण्यासाठी एकूण तीन कार खरेदी केल्या होत्या. यातील लाल रंगाची तिसरी फोर्ड इकोस्पोर्ट कार फरिदाबादच्या खंडावली गावातून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. उमरने लाल किल्ल्याजवळ गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला होता. डीएनए नमुन्यांवरून स्पष्ट झाले की, स्फोट झालेली सफेद ह्यंदाई कार डॉ. उमरच चालवत होता. फरीदाबादमधील या दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांतही जोडले गेल्याची शक्यता असून, पोलीस या दिशेने तपास करत आहेत.