काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:04 IST2025-11-13T07:02:44+5:302025-11-13T07:04:23+5:30
Delhi Blast Update: जम्मू–कश्मीर पोलिसांनी तीन दिवसांत दहशतवादी नेटवर्कविरुद्ध महामोहीम राबवली असून, सुमारे १,५०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्थानिक समर्थन यंत्रणेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यभरात झडती मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
- सुरेश एस डुग्गर
जम्मू - जम्मू–कश्मीर पोलिसांनी तीन दिवसांत दहशतवादी नेटवर्कविरुद्ध महामोहीम राबवली असून, सुमारे १,५०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्थानिक समर्थन यंत्रणेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यभरात झडती मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
कुलगाम, सोपोर व आसपासच्या भागांत जमात-ए-इस्लामी तसेच जेकेएनओपीएसशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर पोलिसांनी छापे टाकले. या मोहिमेत ४०० पेक्षा जास्त ठिकाणी घेराबंदी आणि शोधमोहीम करण्यात आली. सुमारे ५०० संशयितांशी चौकशी झाली असून, काहींना प्रतिबंधात्मक कायद्यान्वये मट्टन (अनंतनाग) कारागृहात हलवले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान मोबाइल, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. काही जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांकडून दहशतवादी नेटवर्कला मिळणाऱ्या मदतीचा मागोवा घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.
पोलिस पथकांचे छापे
जेईआय ही संघटना आपल्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून आपल्या कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
या दरम्यान काश्मीर खोऱ्यातील कुलगाम, पुलवामा, शोपियान, बारामुल्ला व गंदरबल जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिस पथकांनी छापे टाकले. यावेळी पोलिसांनी जेईआयचे सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांची व परिसराची झडती घेतली.
३० ठिकाणी छापे
सोपोरमध्ये पोलिसांनी बुधवारी जमात-ए-इस्लामीशी संबंधित २५ ते ३० ठिकाणी एकत्रित छापे टाकले. या कारवाईदरम्यान संशयास्पद दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि छापील साहित्य जप्त करण्यात आले असून, अनेक जणांची चौकशी सुरू आहे.