निवडणुकीपूर्वीच दिल्ली विधानसभा अध्यक्षांची राजकीय संन्यासाची घोषणा; केजरीवालांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:09 IST2024-12-05T12:09:18+5:302024-12-05T12:09:31+5:30
१९९३ मध्ये पहिल्यांदा गोयल हे भाजपातून आमदार झाले होते. आपच्या उदयानंतर ते आपमध्ये सहभागी झाले होते.

निवडणुकीपूर्वीच दिल्ली विधानसभा अध्यक्षांची राजकीय संन्यासाची घोषणा; केजरीवालांना पत्र
दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु झाले आहेत. आपने उमेदवार यादी जाहीर केली आहे, तसेच काँग्रेससोबत आघाडी करणार नाही हे देखील जाहीर करून टाकले आहे. यातच आता दिल्ली विधानसभेच्या अध्यक्षांनी आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांना पत्र पाठवून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे.
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आणि आपचे आमदार राम निवास गोयल यांनी गुरुवारी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. गोयल यांनी वाढत्या वयाचे कारण दिले आहे. वय झाल्याने मी निवडणुकीचे राजकारणापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी केजरीवाल यांना कळविले आहे. परंतू, पक्षाचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
गोयल हे गेल्या १० वर्षांपासून शहादरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आपने आपल्याला सन्मान दिला, याबाबत त्यांनी केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. तसेच पक्षाच्या आमदारांचेही आभार मानले आहेत.
केजरीवाल यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोयल यांचा निर्णय हा आमच्यासाठी भावुक क्षण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला विधानसभेत आणि बाहेर योग्य दिशा दाखविली आहे. वाढत्या वयामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच माझ्याकडे राजकीय संन्यासाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करत आहोत, असे केजरीवाल म्हणाले आहेत. १९९३ मध्ये पहिल्यांदा गोयल हे भाजपातून आमदार झाले होते. आपच्या उदयानंतर ते आपमध्ये सहभागी झाले होते.