दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारीला; ११ ला मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:36 IST2020-01-07T06:35:46+5:302020-01-07T06:36:05+5:30
देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार

दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारीला; ११ ला मतमोजणी
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून, जनतेचा कौल ११ फेब्रुवारी रोजी निकालानंतर स्पष्ट होईल. निवडणुकीची घोषणा झाल्याने दिल्लीत आचारसंहिता लागू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेते राहुल व प्रियंका गांधी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. आम आदमी पक्ष व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल.
दिल्लीतील ७० मतदारसंघांत एकाच टप्प्यात मतदान होईल. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विशेष केंद्र उभारण्यात आले आहे. प्रत्येक प्रसारमाध्यमात, सोशल मीडियात निवडणुकीशी संबंधित मजकूर तपासला जाईल. सर्वच राजकीय पक्षांच्या समर्थनात/विरोधात सोशल मीडियावरून होणा-या प्रचारावर आयोगाची नजर असेल.
>१२ मतदारसंघ : अनुसूचित जातीसाठी
मतदार : १ कोटी ४७ लाख ३ हजार ६९२
पुरुष : ८० लाख ५५ हजार ६६ हजार
महिला : ६६ लाख ३५ हजार ४२ हजार
यादी : १०० टक्के मतदारांची नावे सचित्र