दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. यानंतर आता देशाच्या राजधानीत राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे, यावेळी दिल्लीत कुणाचे सरकार येणार? यातच, विधानसभा निवडणुकीवरील पहिल्या सर्वेक्षणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी पोलमध्ये आप आणि भाजपमध्ये अगदी अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीन फॅक्टर्सवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भाजप सत्तेच्या अगदी जवळ असल्याचे अथवा बहुमताच्याही पुढे जात असल्याचे दिसत आहे.
जर 'आप'ने केवळ मोफतची आश्वासनं दिली तर काय होईल? - भाजपने अद्याप महिलांसाठी आर्थिक मदतीचे अधिकृत आश्वासन दिलेले नाही. तर दुसरीकडे, आम आदमी पक्षाने दरमहा २१०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. टाईम्स नाऊ जेव्हीसी सर्व्हेनुसार, या परिस्थितीत आम आदमी पक्षाला थेट फायदा होऊ शकतो. त्यांना ५५ टक्के महिला मते मिळू शकतात. भाजपला ३९%, काँग्रेसला ५% आणि इतरांना १% महिला मते मिळू शकतात.
याच बरोबर, आम आदमी पक्षाला पुरुष आणि महिला मतदारांकडून सुमारे ५१.३० लाख (५१.२०%) मते मिळू शकतात. तर, दुसरीकडे भाजपला ४०.६३ टक्के मतांसह ४०.७० लाख मते मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला ६.२ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात. याशिवाय, जागांसंदर्भात बोलायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला ५६-६० जागा मिळू शकतात आणि भाजपला १०-१४ जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे तर खातेही उघडणार नाही.
काय होऊ शकतो भाजपच्या आश्वासनांचा परिणाम? - या सर्वेक्षणात असेही म्हणण्यात आले आहे की, जर भाजपने महिलांसाठी लाडकी बहीण सारखी योजना आणली, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. यानंतर, त्यांना ४५ टक्के महिला मते मिळू शकतात. मात्र ५० टक्के लोक आम आदमी पक्षाच्याच बाजूने असतील. तर काँग्रेसला ४ टक्के आणि इतरांना १ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत आम आदमी पक्षाला ४७.३७ लाख (४७.२९ टक्के) मते मिळू शकतात. तर भाजपला ४५.०५ लाख (४४.९९ टक्के) मते मिळू शकतात. याशिवाय, काँग्रेसला ६.१६ टक्के आणि इतरांना १.५४ टक्के मते मिळू शकतात.
अशा परिस्थितीत, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात अटीतटीची लढत होऊ शकते. 'आप'ला ३३-३७ जागा मिळू शकतात, तर भाजपला ३३ ते ३६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेसलाही एक जागा मिळू शकते.
या परिस्थिती भाजपचा विजय - जर काँग्रेसने २५०० रुपयांच्या 'प्यारी दीदी योजना' आणि इतर मोफत आश्वासनावर चांगला प्रचार केला, तर याचा फटका आम आदमी पक्षाला बसू शकतो. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसने त्यांच्या आश्वासनांचा चांगला प्रचार केला तर त्यांना ७.५ टक्के मते मिळू शकतात. अशा परिस्थितीत, 'आप'ला ४४.७४ टक्के आणि भाजपला ४६.१६ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीत आम आदमी पक्ष बहुमतापासून दूर राहू शकतो. त्यांना २७ ते ३३ जागा मिळू शकतात. तर, भाजप ३७-४१ जागांपर्यंत मजल मारू शकतो. तर काँग्रेसला ०-२ जागां मिळू शकतात.