"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:38 IST2025-01-30T19:34:25+5:302025-01-30T19:38:14+5:30

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Delhi Assembly Election Rahul Gandhi called Arvind Kejriwal smarter than PM Narendra Modi | "अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

Rahul Gandhi Slam Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आलेली असताना राजधानीतलं राजकीय वातावरणं चांगलेच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतल्या सभेत बोलताना आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल हे एकामागून एक खोटं बोलत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींपेक्षाही हुशार असल्याचे राहुल गांधींनी म्हटलं. तसेच काँग्रेसने दलित आणि मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच सत्तेवर आला नसता, असंही राहुल गांधी म्हणाले.

गुरुवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बादली विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. "अरविंद केजरीवाल तुम्ही ५ वर्षांपूर्वी यमुनेचे पाणी पिण्याचे बोलत होतात. आज कोणीतरी मला सांगितले की ते यमुना नदीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन पत्रकार परिषद घेत आहे. हा पोकळपणा आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

"अरविंद केजरीवाल खोटे बोलत आहेत. पंतप्रधान मोदी जसे खोटे बोलतात तसे केजरीवालही खोटे बोलतात. त्यांच्यात काहीच फरक नाही. केजरीवाल हे मोदींपेक्षा हुशार आहेत. एक गोष्ट विसरू नका की तुमच्या पाठीशी कोण उभं आहे? संविधानाचे रक्षण कोण करतो आणि सत्य कोण बोलतो?," असंही राहुल गांधी म्हणाले.

"माझी गेल्या २० वर्षांची भाषणे तुम्ही पाहा. मनरेगाचे आश्वासन दिले आणि पूर्ण केले. अन्न हक्काचे वचन दिले, ते मिळाले. कर्जमाफीचे आश्वासन दिले, ते मिळाले. कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास देण्याचे आश्वासन पूर्ण झाले. कर्नाटक आणि तेलंगणातील महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे आश्वासन दिले, ते आम्ही पूर्ण केले. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना धानाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते मिळाले," असं राहुल गांधींनी म्हटलं.

"आम्ही दलित आणि अत्यंत मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता तर आरएसएस कधीच सत्तेवर आली नसती. इंदिरा गांधींच्या काळात हा विश्वास पूर्णपणे अबाधित होता. दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक सर्वांना माहीत होते की इंदिराजी त्यांच्यासाठी लढतील. १९९० नंतर विश्वास कमी झाला. काँग्रेसला हे वास्तव स्वीकारावे लागेल. काँग्रेसने ज्या प्रकारे तुमचे हित जपायला हवे होते तसे केले नाही. या विधानाने मला नुकसान होऊ शकते, परंतु मला पर्वा नाही कारण ते खरे आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
 

Web Title: Delhi Assembly Election Rahul Gandhi called Arvind Kejriwal smarter than PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.