"ही तर हद्दच झाली..., हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन..."; नवी दिल्ली जागेवर असं काय घडलं की केजरीवाल भडकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:00 IST2025-02-05T16:59:56+5:302025-02-05T17:00:43+5:30
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत...

"ही तर हद्दच झाली..., हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन..."; नवी दिल्ली जागेवर असं काय घडलं की केजरीवाल भडकले?
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी आज बुधवारी सर्वच्या सर्व ७० जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने काही जागांवर गैरव्यवस्थापन आणि अनियमिततेचे आरोपही केले आहेत. यातच, आम आदमी पक्षाने नवी दिल्लीच्या जागेसंदर्भातही अनेक तक्रारी केल्या आहेत. या जागेवर निवडणूक लढवणारे अरविंद केजरीवाल, रिलीव्हरला आत जाऊ न दिल्याने संतापले आहेत. तसेच, हे मानवाधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटेल आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आरोप केला आहे की, "नवी दिल्ली मतदारसंघातील जवळपास अर्ध्या बुथवर, पोलिंग एजन्ट्सना बाहेर येऊ दिले जात नाही, तसेच रिलिव्हरलाही आत जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारी येत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे, तक्रार करण्यासाठी पोहोचलेले खासदार म्हणाले, जर, पोलिंग एजन्टला बाहेर येऊ दिले नाही, तर किती मतदान झाले, काही बोगस मतदान तर झाले नाही ना, इव्ही एम व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे अधिकृतपणे बाहेर येऊ शकत नाही. यामुळे रिलिव्हरला आत जाऊ द्यावे, अशी मागणीही आपण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ही तर हद्दच झाली... -
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारे अरविंद केजरीवाल आता रिलिव्हरच्या मुद्यावरून भडकले आहेत. त्यांनी राघव चड्ढा यांचा व्हिडिओ शेअरून निवडणूक आयोगाला टॅग करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "ही तर हद्दच झाली. रिलिव्हरला कसे आत जाऊ देणार नाही. आतल्या बूथ एजन्टल जर टॉयलेटसाठी बाहेर जायचे असेल तर? त्याच्या जागी रिलिव्हर तर जाईलच. हे तर मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. आपण बूथ एजन्ट्सना बंदी बनवून कसे ठेऊ शकता?"