न्यायाधीशांना मारण्यासाठी विष मिसळलं जाईल का?; युमनेच्या पाण्यावरुन PM मोदींनी केजरीवालांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:09 IST2025-01-29T15:08:18+5:302025-01-29T15:09:07+5:30
मी सुद्धा यमुना नदीचे पाणी पितो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

न्यायाधीशांना मारण्यासाठी विष मिसळलं जाईल का?; युमनेच्या पाण्यावरुन PM मोदींनी केजरीवालांना सुनावलं
PM Narendra Modi Slam Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकार यमुना नदीचे पाणी जाणूनबुजून प्रदूषित करत असल्याचा आरोप केला होता. हरिणातील भाजप सरकार यमुना नदीचे पाणी प्रदूषित करून दिल्लीत पाठवत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीच्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे आता यमुनेचे पाणी दूषित केल्याचा दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी सुद्धा यमुनेचे पाणी पितो असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
करतार नगर येथील संकल्प सभेला बोलताना पंतप्रधान मोदींनी यमुनेच्या पाण्यावरून आम आदमी पक्षाच्या सरकारला धारेवर धरले. त्यांची बोट यमुनेतच बुडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यमुनेत विष मिसळल्याच्या दाव्याला हरियाणाचा अपमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी, तेही तेच पाणी पितात, न्यायाधीश आणि परदेशी राजदूतही तेच पाणी पितात, त्यांना मारण्यासाठी विष मिसळले जाईल का? असा सवाल केला.
"राजकीय स्वार्थासाठी या गुन्हेगारांनी आणखी एक गंभीर पाप केले आहे. हे पाप कधीही माफ होणार नाही. इतिहासही त्यांना कधीच माफ करणार नाही. आज तुमच्या शिष्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तुमच्या इको-सिस्टमने ते लपवण्याचा प्रयत्न केला तरी देश मात्र हे विसरू शकणार नाही, दिल्लीही विसरू शकणार नाही. हरियाणातील प्रत्येकजण हे विसरू शकत नाही. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हरियाणातील जनतेवर घृणास्पद आरोप केलेत. पराभवाच्या भीतीने ते हैराण झालेत. हरियाणातील लोक दिल्लीपेक्षा वेगळी आहेत का? हरियाणातील लोकांची कुटुंबे आणि मुले दिल्लीत राहत नाहीत का? हरियाणातील लोक त्यांच्या मुलांच्या पाण्यात विष मिसळू शकतात का?," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"गेल्या ११ वर्षांपासून पंतप्रधानही हेच पाणी पितोय. हरियाणावरुन पाठवलेलं पाणी दिल्लीत राहणारे न्यायाधीश, सर्व आदरणीय सदस्य, परदेशी राजदूतही पितात. हरियाणातील भाजप सरकारने मोदींना विष देण्यासाठी पाण्यात विष टाकले आहे, असे कोणी विचार तरी करू शकेल का? काय म्हणताय तुम्ही? देशातील न्यायाधीशांना विष पाजून मारण्याचा कट केला जातोय का?," असा सवालही पंतप्रधान मोदींनी केला.
दरम्यान, सोमवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला. हे पाणी सीमेवर थांबवले नसते तर दिल्लीत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असता, असं केजरीवाल म्हणाले. या दाव्यावर निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्याकडून पुरावे मागवले आहेत. दिल्ली भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत प्रचारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.