"10% ची गडबड होऊ शकते..."; दिल्लीत मतदानापूर्वी केजरीवाल यांनी व्यक्त केली वेगळीच शंका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:54 IST2025-02-03T16:53:33+5:302025-02-03T16:54:16+5:30
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडिओद्वारे ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित केली आहे.

"10% ची गडबड होऊ शकते..."; दिल्लीत मतदानापूर्वी केजरीवाल यांनी व्यक्त केली वेगळीच शंका!
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मतदानाच्या दोन दिवस आधीच मशीनमध्ये गडबड होण्याची शंका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, १० टक्के मतांमध्ये फेरफार होऊ शकतो. खबरदारी म्हणून आपण एक वेबसाइट तयार केली आहे, तिच्यावर प्रत्येक बूथवरील डेटा अपलोड केला जाईल आणि गडबड रोखण्याचा प्रयत्न केला जाईल.
निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडिओद्वारे ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. तसेच, याचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीसंदर्भातही भाष्य केले आहे. महत्वाचे म्हणजे, १० टक्के मतांमध्ये गडबड होऊ शकते, अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले, 'मी जिथे जातो तिथे लोक मला एकच सांगतात की, आम्ही तर आपल्यालाच मतदान करतो, पण कुठे जाते माहित नाही. केजरीवालजी, मशीन सांभाळून घ्या. त्यात मोठी गडबड आहे. या कोलांनी मशीन्समध्ये बरीच गडबड केली आहे." तसेच, हे मशीनच्या माध्यमाने १० टक्के मतांमध्ये फेरफार करू शकतात, अशीम माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाल्याचेही केजरीवाल यानी म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले, "एवढे मतदान करा की, प्रत्येक झाडूवाला मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडायला हवा. जर आपल्याला १५ टक्क्यांची आघाडी मिळाली तर आपण ५ टक्क्यांनी जिंकू. प्रत्येक ठिकाणी १० टक्क्यांहून अधिक लीड मिळायला हवे. एवढे मतदान करा की, त्यांच्या मशीनवरही आपलाच विजय व्हायला हवा. मशीनवर मात करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे."
केजरीवाल म्हणाले, खबरदारी म्हणून आम आदमी पक्षाने एक वेबसाइट देखील तयार केली आहे. मतदानाच्या दिवशी या वेबसाईटवर प्रत्येक मतदान केंद्रावरून 6 प्रकारचा डेटा अपलोड केला जाईल. कोणत्या बूथवर किती मते मिळाली आणि शेवटी ईव्हीएमची बॅटरी किती होती, हे देखील वेबसाईटवर अपलोड केले जाईल. महत्वाचे म्हणजे, केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांत आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावरही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत.