आपच्या यादीत राहुल गांधींचा 'बेईमान' म्हणून उल्लेख; अरविंद केजरीवाल कुणालाच सोडणार नसल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:00 IST2025-01-25T16:54:20+5:302025-01-25T17:00:32+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार पोस्टरवॉर सुरु असून आपने आता थेट राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

आपच्या यादीत राहुल गांधींचा 'बेईमान' म्हणून उल्लेख; अरविंद केजरीवाल कुणालाच सोडणार नसल्याचा दावा
Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येत आहे तसे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. लोकसभा निवडणुकीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षात या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या या पक्षांनी एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशातच आम आदमी पक्षाने आता काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. आपने बेईमान लोकांच्या यादीत राहुल गांधींचा विशेष उल्लेख केला आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आम आदमी पक्षाने अचानक काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. शनिवारी सकाळी आम आदमी पार्टीने एक पोस्टर जारी केले होते ज्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा बेईमान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर राहुल गांधींचा फोटो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
काँग्रेसने मद्य घोटाळ्याशी संबंधित एक ऑडिओ जारी केल्यानंतर आपने हा पलटवार केला आहे. आपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भ्रष्ट ठरवणारे पोस्टर जारी केले आहे. पोस्टरवरील सर्वांना अरविंद केजरीवाल सोडणार नाही असेही यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता आप विरुद्ध काँग्रेस असा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.
आपने जारी केलेल्या पोस्टरमध्ये केजरीवाल यांचा प्रामाणिकपणा सर्व बेईमानांना मागे टाकेल, असं म्हटलं आहे. पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रमेश बिधुरी, वीरेंद्र सचदेवा, अनुराग ठाकूर आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो आहेत. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांमध्ये राहुल गांधी, अजय माकन आणि संदीप दीक्षित यांचाही फोटो पोस्टरमध्ये आहे.
एक अकेला पड़ेगा सब पर भारी 🔥 pic.twitter.com/5jkvWaDXt4
— AAP (@AamAadmiParty) January 25, 2025
जर राहुल गांधींना भाजप नेत्यांच्या सोबत उभे केले नाही तर ते मोठ्या प्रमाणात मतं आपल्या बाजून वळवू शकतात, असा आपचा विश्वास आहे. मात्र, आपने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोस्टर वॉरपासून दूर ठेवले आहे. दुसरीकडे आपची मतं फुटत नाहीत तोपर्यंत दिल्लीत सत्तेत येणं शक्य नसल्याचे काँग्रेसला कळून चुकलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन थेट अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहेत. नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांच्याशी अरविंद केजरीवाल यांची थेट लढत आहे. त्यामुळे या पोस्टरवर राहुल गांधींव्यतिरिक्त अजय माकन आणि संदीप दीक्षित यांचाही समावेश करण्यात आला आहे.